सरकार कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील
फोंडा : संजीवनी साखर कारखान्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना एका वर्षाची मुदत वाढ देण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यासंबंधी कृषी खात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पाठपुरवठा केला आहे. लवकरच कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी मंत्री रवी नाईक यांनी दिली आहे.
संजीवनी साखर कारखान्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची मुदत दि. ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. त्यामुळे कामगार वर्ग संभ्रमात सापडले आहे. त्यासंबधी कृषी मंत्री रवी नाईक यांना विचारले असता त्यांनी सरकार कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
तसेच सरकार कामगारांचे हित जपत असून मुदत संपुष्टात आलेल्या कामगारांना एका वर्षाची मुदत वाढ देण्यासाठी कृषी खात्याने प्रयत्न केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंजुरी दिल्यानंतर कामगारांचा प्रश्न सुटणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, मुदत संपुष्टात आल्याने मंगळवारी रोजंदारीवरील कामगारांनी गेट बाहेर हजेरी लावली असून ते मुदत वाढ करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.