टीम इंडियाचा बांगलादेशला व्हाईटवॉश

कसोटी मालिका २-० ने घातली खिशात : आर. अश्विनची ऐतिहासिक कामगिरी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
01st October, 11:53 pm
टीम इंडियाचा बांगलादेशला व्हाईटवॉश

कानपूर : कानपूर येथील दुसऱ्या कसोटीत भारताने बांगलादेशवर ७ गडी राखून विजय मिळवला. यामुळे भारताने ही कसोटी मालिका २-० ने खिशात घातली. दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने अर्धशतकी खेळी केली. तर विराट कोहली २९ धावांवर आणि ऋषभ पंत ४ धावांवर नाबाद राहिला. कानपूर कसोटी सामन्यातील सोमवारी चौथ्या दिवशी भारतीय संघाने बांगला देशचा पहिला डाव २३३ धावांत आटोपला होता. दरम्यान, मंगळवारी बांगलादेशचा दुसरा डाव १४६ धावांवर गुंडाळला. यामुळे भारताला विजयासाठी ९५ धावांची गरज होती. हे लक्ष्य भारताने ३ गडी गमावत पूर्ण केले.
भारताने सोमवारी आपला पहिला डाव ९ बाद २८५ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर सोमवारी दिवसअखेर बांगलादेशने दुसऱ्या डावात २ बाद २६ धावा केल्या होत्या. मंगळ‍वारी बांगलादेशने दुसरा डाव २ बाद २६ धावांवरून पुढे खेळला. पण पहिल्या सत्रात बांगलादेशला एकामागोमाग एक असे धक्के बसले. यामुळे त्यांचा दुसरा डाव सर्वबाद १४६ धावांवर आटोपला. बुमराह, अश्विन आणि जडेजा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर आकाश दीपने १ विकेट घेतली. आर अश्विन याला त्याच्या शानदार अष्टपैलू कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्कार मिळाला. तर कानपूरमधील दुसऱ्या कसोटीत सलग अर्धशतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
भारताला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्‍य
बांगलादेशकडून दुसऱ्या डावात शादमान इस्लामने सर्वाधिक ५० धावा केल्या. याशिवाय मंगळवारी बाद झालेल्यांमध्ये मोमिनुल हक (२), कर्णधार नजमुल शांतो (१९), मुशफिकुर रहीम (३७), लिटन दास (१), मेहदी हसन मिराज (९) यांचा समावेश आहे. शकील अल हसन आणि तैजुल इस्लाम यांना खातेही उघडता आले नाही. याआधी सोमवारी झाकीर हसन (१०) आणि हसन महमूद (२) बाद झाले. बांगलादेशचा दुसरा डाव १४६ धावांवर आटोपला आणि त्यामुळे भारताला विजयासाठी केवळ ९५ धावांचे लक्ष्‍य मिळाले.
विजयाची औपचरिकता पूर्ण करण्‍यासाठी भारतीय फलंदाज मैदानात उतरले. मात्र, तिसर्‍या षटकात भारताला पहिला धक्‍का बसला. कर्णधार रोहित शर्मा ८ धावांवर बाद झाला. तर पाच षटकात ६ धावांवर खेळणार्‍या शुभमन गिलला मिराज याने पायचित केले. ३४ धावांवर भारताला दुसरा धक्‍का बसला. यानंतर यशस्‍वी जैस्‍वाल आणि विराट काेहली यांच्‍या खेळीने भारताला विजया समीप नेले.
जैस्‍वाल विराटची फटकेबाजी लक्षवेधी
१६ व्‍या षटकात फटकेबाजीच्‍या नादात जैस्‍वालने शकीबकडे साेपा झेल दिला. त्‍याने ४५ चेंडूत ८ चाैकार आणि १ षटकार फटकावत ५१ धावांची खेळी केली. विराट आणि यशस्‍वीची तिसर्‍या विकेटसाठी निर्णायक ५८ धावांची भागीदारी झाली. १८ व्‍या षटकात भारताने ९५ धावांचे लक्ष्‍य पूर्ण केले. भारताच्‍या दुसर्‍या डावात यशस्‍वी जैस्‍वालच्‍या अर्धशतकी खेळीबराेबरच विराट काेहलीची फटकेबाजी लक्षवेधी ठरली. विराट ३७ चेंडूत २९ धावा तर पंत ४ धावांवर नाबाद राहिले. सामन्‍यात अवघ्‍या १७४ षटकांचा खेळ
कसोटी सामन्यात एका दिवसात ९० षटकांचा खेळ हाेताे. कानपूर कसोटीत बांगलादेशने पहिल्या डावात ४७.२ षटके खेळली, भारताने पहिल्या डावात ३४.४ षटके खेळली. बांगलादेशने दुसऱ्या डावात ४७ षटके खेळली आणि भारताने दुसऱ्या डावात बांगलादेशने दिलेले ९५ धावांचे लक्ष्य अवघ्या १७.२ षटकांमध्येच पूर्ण केले.
घरच्‍या मैदानावर भारताचा सलग १८वा मालिका विजय
टीम इंडियाने घरच्‍या मैदानावर सलग १८ वी मालिका जिंकली आहे. २०१३ पासून भारतीय क्रिकेट संघाने मायदेशात खेळताना एकही मालिका गमावलेली नाही. त्‍यचबरोबर बांगला देशविरोधात अजिंक्‍य राहण्‍याचा भारताचा विक्रम अबाधित राहिला आहे. आतापर्यंत उभय संघात १५ सामने झाले असून, भारताने एकही सामना गमावलेला नाही.
जैस्‍वालच्‍या सर्वाधिक धावा, अश्‍विन-बुमराहच्या सर्वाधिक विकेट
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत यशस्वी जैस्वालने सर्वाधिक धावा केल्या. त्याने दुसर्‍या कसोटीतील दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. जैस्वालने या मालिकेत ४७.२५च्या सरासरीने १८९ धावा केल्या. तर जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनी मालिकेत प्रत्‍येकी प्रत्येकी ११ विकेट घेतल्या.


अश्विनचा ११वा ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कार
अश्विनचा हा कसोटी करिअरमधील ११वा प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार ठरला आहे. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकणाऱ्या मुथय्या मुरलीधरनची बरोबरी केली आहे. श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूने त्याच्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत एकूण ६१ कसोटी मालिका खेळल्या, ज्यातील ११ मालिकांमध्ये त्याने प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला. तर २०११ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या अश्विनने आतापर्यंत केवळ ४२ मालिका खेळून हा टप्पा गाठला आहे. अशाप्रकारे ५० पेक्षा कमी मालिकांमध्ये ११ प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार जिंकणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. अश्विन सक्रिय खेळाडू आहे, तो भारतासाठी सातत्याने कसोटी क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे भविष्यात त्याला मुरलीधरनला मागे सोडण्याची संधी असेल.
सर्वाधिक प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकणारे खेळाडू
मुथय्या मुरलीधरन : ११
रविचंद्रन अश्विन : ११
जॅक कॅलिस : ८
शेन वॉर्न : ८
इम्रान खान : ८
रिचर्ड हॅडली : ८               

डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारत अव्वल

कानपूर कसोटी जिंकून भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. टीम इंडियाने ११ सामन्यांत ८वा विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. भारताची या पुढची मालिका न्यूझीलंडविरुद्ध आहे. ३ सामन्यांची ही मालिका देखील भारतीय भूमीत खेळवली जाणार आहे. त्यानंतर रोहितसेना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर मालिका खेळायला जाईल.