कानपूर कसोटी अखेर रंगतदार वळणावर; जसप्रीत बुमराहची शानदार गोलंदाजी
कानपूर : पहिल्या दिवशी केवळ ३६ षटकांचा खेळ व दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर भारतीय संघाने चौथ्या दिवशी बांगलादेशविरुद्ध आपली पकड मजबूत केली आहे. ड्रॉच्या दिशेने सरकणाऱ्या या कानपूर कसोटीत निकाल लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आता भारताची बांगलादेशपेक्षा वेळेशी शर्यत लागली आहे. एका दिवसात भारताला बांगलादेशचे ८ फलंदाज बाद करून कमीत कमी लक्ष्य मिळवण्यावर असेल.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने २ गडी गमावून २६ धावा केल्या होत्या. दुसरा आणि तिसरा दिवस पावसाने दिवस पूर्णपणे वाहून गेल्यानंतर बांगलादेशने आपला डाव १०७ धावांवरुन पुढे खेळण्यास प्रारंभ केला. चौथ्या दिवसाच्या खेळात एकूण १८ विकेट पडल्या आणि दिवसभरात एकूण ४३७ धावा झाल्या. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात शादमान इस्लामने ७ धावा केल्या आणि पहिल्या डावातील शतकवीर मोमिनुल हक दुसऱ्या डावात अद्याप खातेही उघडू शकलेला नाही.
भारताने पहिला डाव २८५ धावांवर घोषित केला. बांगलादेश पुन्हा फलंदाजीला आला तेव्हा शादमान इस्लाम आणि झाकीर हसन विकेट वाचवण्याच्या इराद्याने खेळताना दिसले. पण रविचंद्रन अश्विनने या बचावात्मक रणनीतीचा पुरेपूर फायदा उठवला. त्याच्या फिरणाऱ्या चेंडूंनी दुसऱ्या डावात बांगलादेशचे २ बळी घेतले. चौथ्या दिवशी बांगलादेशची धावसंख्या २ गड्यांच्या मोबदल्यात २६ धावांवर पोहोचली असून दुसऱ्या डावात ते अजूनही भारतापेक्षा २६ धावांनी मागे आहे.
बांगलादेशला स्वस्तात गुंडाळले
पहिल्या दिवशी ३५ षटकांचा खेळ झाला. यामध्ये बांगलादेशने ३ विकेट गमावून १०७ धावा केल्या. चौथ्या दिवशी मैदानावर आल्यानंतर लगेचच ११ धावा करून मुशफिकुर बाद झाला, पण मोमिनुल दुसऱ्या टोकाकडून शेवटपर्यंत क्रीजवर राहिला. त्याने १०७ धावांची नाबाद खेळी खेळली आणि संघाला २३३ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ बळी घेतले.