ढाबा स्टाईल पनीर मसाला

तुमचा रविवार चमचमीत बनवण्यासाठी शाकाहार सुद्धा मांसाहाराला टफ फाईट देणारे ठरू शकते ते म्हणजे पनीरमुळे. आपण एरवी हॉटेल, ढाब्यांवरील पदार्थांवर ताव मारतो तसेच पदार्थ घरच्या घरी करून पहा. आजचा पदार्थ आहे, ढाबा स्टाईल पनीर मसाला.

Story: चमचमीत रविवार |
29th September, 04:51 am
ढाबा स्टाईल पनीर मसाला

साहित्य : 

तूप/बटर/तेल ३ ते ४ चमचे, दालचिनी १ तुकडा, दगडफूल १, तमालपत्र १ ते २, हिरवी वेलची १ चमचा, बारीक चिरलेला कांदा १ वाटी, आलं लसून पेस्ट २ लहान चमचे, किचन किंग मसाला/गरम मसाला १ किंवा २ चमचे, एक चमचा बेसन, टोमॅटो प्युरी एक वाटी, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी एक मोठा चमचा, पनीर २५० ग्राम, कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून.

कृती : 

प्रथम एका भांडयात तूप/बटर/तेल घेऊन त्यात दालचिनी, दगडफूल, तमालपत्र, हिरवी वेलची हे तीस ते चाळीस सेकंदांसाठी भाजून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून त्याला चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्या. त्यात आले लसून पेस्ट टाकून परत परतून घ्या. आता त्यात किचन किंग/गरम मसाला, एक चमचा धणे पूड घालून हे सर्व छान एकत्र करून घ्या. मग हे सर्व मिश्रण एका बाजूला करून त्याच पातेल्यात एक चमचा बेसन भाजून घ्या. बेसन छान भाजले की सर्व जिन्नस एकत्र करा. यात टोमॅटो प्युरी घाला. सर्व एकत्र करून छान पाच मिनटे शिजवून घ्या. या मसाल्याला तेल सुटले पाहिजे. यात एक कप गरम पाणी मिसळा. पाणी गरमच घाला म्हणजे मसाल्याला छान तवंग सुटतो. नंतर यात चवीनुसार मीठ घालून यात आता पनीर घाला आणि दोन मिनिटांसाठी शिजवून घ्या व शेवटी कसुरी मेथी आणि कोथिंबीर भुरभुरवा. स्वाद वाढवायला सगळे छान ढवळून घ्या. ढाबा स्टाईल पनीर मसाला खाण्यासाठी तयार आहे. 


संचिता केळकर