गृह खात्याला उद्देशून लिहलेल्या पत्रात दिली माहिती, गोवकरांच्या भावना दुखावल्याबद्धलही मागितली माफी
पणजी : 'दिल्ली, रुलर्स ऑफ इंडिया, नाऊ कॉन्कर गोवा' या वादग्रस्त जाहिरातीबद्दल गोवा सरकारची 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' समूहाला नोटीस बजावली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार ती वादग्रस्त जाहिरात अभिनंदन लोढा समूहाने ३१ जुलै रोजीच मागे घेतली आहे. गोवेकरांची भावना दुखावल्याबद्दल माफी मागतानाच अभिनंदन लोढा समूहाने गोव्याची संस्कृती व वारशाचा आम्ही आदर करीत असल्याचे एका निवेदनात स्पष्ट केले आहे.
जाहीरात मागे घेतल्याचे तसेच माफी मागणारे पत्र लोढा समूहाने सरकारच्या गृह खात्याला पाठविले आहे. ही वादग्रस्त जाहिरात समूहाच्या वाहिनीद्वारे प्रसिद्ध झाल्याचे समोर आल्यानंतर ३१ जुलै २०२४ रोजी ती हटविण्यात आली असे पत्रात म्हटले आहे.
अभिनंदन लोढा समूहाने राज्यात बांधकाम प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाची राज्यात सर्वत्र जाहिरात सुरू आहे. विधानसभेतही या जाहिराती संदर्भात प्रश्न उपस्थित झाला होता. बऱ्याच जणांनी टॅग लाईनला आक्षेप घेतल्या नंतर सरकारने गुरूवारी अभिनंदन लोढा समूहाला याबाबत नोटीस जारी केली होती. जाहिरात मागे न घेतल्यास कारवाईचा इशारा सरकारने दिला होता. ही जाहिरात ३१ जुलै रोजीच मागे घेण्यात आल्याचे पत्र समृहाने गृह खात्याला पाठवल्या नंतर हा वाद संपुष्टात आला आहे.