पणजी : पाळीव कुत्रा एखाद्या व्यक्तीला चावल्यास त्याच्या उपचाराचा खर्च तसेच नुकसान भरपाई मालकाला द्यावी लागणार आहे. पशुसंवर्धन खात्याने याबाबत नुकतीच नियमावली जारी केली आहे. यानुसार खात्याकडे पाळीव कुत्र्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. याशिवाय अशा कुत्र्याच्या वागणुकीसाठी मालकांना प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे. प्रसंगी मालकांवर भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
नियमावलीत स्पष्ट केले आहे की, कुत्रे किंवा अन्य जनावरे पाळणाऱ्या मालकांनांच त्यांची जबाबदारी घ्यावी लागेल. पाळीव जनावरांनी व्यक्ती अथवा अन्य जनावरांना हानी पोहोचवल्यास किंवा त्यांना जखमी केल्यास मालकांना वैद्यकीय खर्च करावा लागेल. याबाबत मालकांनी पशुसंवर्धन खात्याला प्रतिज्ञापत्र लिहून देणे आवश्यक आहे. पाळीव कुत्र्यांची नोंदणी करताना मालकाचे नाव, पत्ता, कुत्र्यांची प्रजाती, वय, निर्बीजीकरण केले असल्यास त्याची माहिती द्यावी लागणार आहे.
पाळीव तसेच हिंस्त्र जातीच्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी नेताना त्यांच्यावर चेन किंवा तत्सम गोष्टींनी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मालक त्यांच्या कुत्र्यांना अन्य व्यक्तींवर हल्ला करणे किंवा त्यांना त्रास देण्यासाठी सूचना देऊ शकत नाहीत. पाळीव कुत्र्याला अन्य कुत्रे किंवा जनावरे चावल्यावर रेबीजची लक्षणे दिसू लागल्यास खात्याला कळवणे गरजेचे आहे. याबाबत चुकीची माहिती दिल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे नियमावलीत स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी हणजुण येथे पिटबुल कुत्र्याच्या हल्यात सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. यानंतर हिंस्त्र जातींच्या पाळीव कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. यानंतर सरकारने पाळीव कुत्र्यांच्या वागणुकीसाठी मालकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. मागील वर्षी ताळगावमध्ये रॉटवायलार कुत्र्याने दोन लहान मुलांचा चावा घेतला होता. या मुलांना गंभीर जमखा झाल्या होत्या.