फोंडा शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदावस्थेत

गुन्ह्यांच्या तपासासाठी घ्यावा लागतो खासगी दुकानांतील कॅमेऱ्यांचा आधार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th September, 12:20 am
फोंडा शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदावस्थेत

फोंडा येथील बंद अवस्थेत असलेला सीसी टीव्ही कॅमेरा.            

फोंडा : फोंडा शहरातील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी काही वर्षांपूर्वी बसविण्यात आलेले सीसी टीव्ही कॅमेरे गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. विविध भागांत बसविण्यात आलेल्या सीसी कॅमेऱ्यांची वेळोवेळी दुरुस्ती झाली नसल्याने सर्व कॅमेरे सध्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळविण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे महत्त्वाचे असतात. परंतु, शहरातील कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी खासगी दुकानातील कॅमेऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे शहरात आवश्यक ठिकाणी लवकर कॅमेरे बसविण्याची मागणी लोकांकडून होत आहे.
फोंडा शहरात काही वर्षांपूर्वी दक्षिण गोव्याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी खासदार निधीतून एकूण २२ सीसी कॅमेरे बसविले होते. या कॅमेऱ्यांची देखभाल करण्याची जबाबदारी एका खासगी एजन्सीला देण्यात आली होती. परंतु, त्या एजन्सीकडून या कॅमेऱ्यांची देखभाल व्यवस्थित झाली नसल्याने सर्व सीसी टीव्ही कॅमेरे काही वर्षातच बंद पडले होते. त्यानंतर शहरातील सर्व कॅमेरे शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. शहरात कॅमेरे नसल्याने अनेकवेळा एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना खासगी दुकानातील कॅमेऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. शहरातील वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात सीसी कॅमेरे उपयुक्त बनले होते. वाहतूक नियमाचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने दंडात्मक कारवाई पोलीस करीत होते. परंतु, सर्व कॅमेरे बंद पडल्याने पोलिसांना रस्त्यावर राहून दंडात्मक कारवाई करावी लागत आहे. फोंडा शहरात वाढती वाहनांची वर्दळ तसेच वाढते गुन्हे लक्षात घेता सीसी टीव्ही कॅमेरे काळाची गरज बनली आहे.
फोंड्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी
गेल्या काही वर्षांत फोंडा पोलीस हद्दीत गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फोंडा पोलिसांनी अनेकवेळा संबंधित खात्याकडे तसेच फोंडा पालिकेकडे अनेकवेळा सीसी टीव्ही बसविण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे. पण अद्याप सीसी टीव्ही कॅमरे बसविण्यात आले नसल्याने पोलिसांची धावपळ उडत आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सरकारने त्वरित दखल घेऊन सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा