पणजी : आरोग्य खात्यातर्फे राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत विविध ३५ जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये नर्स, मानसोपचारतज्ज्ञ, लॅब तंत्रज्ञ, प्रकल्प सहसंयोजक, डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान आरोग्य संचालनालय येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन खात्यातर्फे करण्यात आले आहे.
सर्व जागा एक वर्षाच्या कंत्राटावर भरण्यात येणार आहेत. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार ठरवण्यात आली आहे. तर वयोमर्यादा १८ ते ४० वर्षां दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे १५ वर्षांचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे. ज्या उमेवारांचे पालक राज्य सरकारचे कर्मचारी म्हणून राज्याबाहेर काम करत आहेत. त्यांच्या मुलांना १५ वर्षे रहिवाशी दाखल्याची अट शिथील करण्यात येणार आहे.
याशिवाय उमेदवारांना कोकणीचे ज्ञान असणे गरजेचे आहे. विविध ३५ पदांसाठी महिन्याला १० हजार ते १ लाख रुपये पर्यंत पगार देण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची राज्यभरात कुठेही नियुक्ती केली जाईल. ही पदे राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत भरण्यात येणार असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना कायम करण्यात येणार नाही. तसेच अशा उमेदवारांना भविष्यात कायम स्वरुपी सरकारी नोकरी मागण्याचा अधिकार नसेल. पडताळणीसाठी उमेदवारांना गुणपत्रिका, रहिवासी दाखला आणि जन्म दाखला सादर करावा लागेल.