म्हापशात कला व संस्कृती खाते उभारणार डिजिटल लायब्ररी

पालिकेकडे ना हरकत दाखल्याचा प्रस्ताव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th September 2024, 11:26 pm
म्हापशात कला व संस्कृती खाते उभारणार डिजिटल लायब्ररी

म्हापसा : येथील जीर्णोद्धार केलेल्या जुन्या पालिका तथा आताईद ग्रंथालय वारसा इमारतीमध्ये डिजिटल लायब्ररी उभारण्यासाठी कला व संस्कृती खात्याने म्हापसा पालिकेला नाहरकत दाखला देण्याची सूचना केली आहे. या वाचनालयासाठी कला व संस्कृती संचालनालयाच्या एका योजनेअंतर्गत राज्य सरकारने निधीची तरतूद केली आहे.

गोवा राज्य नागरी विकास एजन्सीतर्फे (जीसूडा) सरकारने या इमारतीच्या जीर्णोद्धाराचे काम २०२२ मध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हाती घेतले होते. ३.८० कोटी रूपये खर्चून हे काम केले जात आहे. यासाठी कंत्राटदाराला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. पण मुदत वाढत गेली. आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुसज्ज असे डिजिटल ग्रंथालय अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. सध्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात असून छप्पर, फरशीसह इतर काम पूर्णत्वास आले आहे.

दरम्यान, या जुन्या व जीर्णावस्थेत असलेल्या इमारतीला ग्रंथालयाचे स्वरूप देण्याचा पालिकेचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून रेंगाळला होता.

इमारत मोडकळीस आल्याने १३ सप्टेंबर २०१९ पासून ती बंद करण्यात आली होती. त्यावेळपासून गेली पाच वर्षे आताईद ग्रंथालय बंदावस्थेत आहे.

तत्पूर्वी जानेवारी २०१६ मध्ये पालिका कार्यालयाचे पाकल्यांचो ट्रॉप या कोर्ट जंक्शनवरील वारसा इमारतीमध्ये स्थलांतरण झाल्यापासून ही जुनी इमारत विनावापर पडून होती. फक्त तळमजल्यावरील आताईद ग्रंथालय तिथे सुरू होते. मात्र, देखभालीअभावी ही इमारत जीर्ण होऊन मोडकळीस आल्याने पूर्णत: बंद करण्यात आली होती.

प्रथम या ठिकाणी जिल्हा ग्रंथालय सुरू करण्याचा प्रस्ताव पालिका मंडळाचा होता. पण, कला आणि संस्कृती खाते व पालिका यांच्यातील सामंजस्य करारामध्ये समस्या निर्माण झाली व या ठिकाणी डिजिटल वाचनालय सुरू करण्याचा निर्णय पालिका मंडळाने घेतला होता. त्यानुसार जीसुडाने इमारतीच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते.