प्लास्टिकने झाकले छत : जुन्या इमारतीचीही स्थिती बिकट
म्हापसा : शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तारित इमारतीला गळती लागली आहे. या गळतीमुळे इमारतीचे छत प्लास्टिक आवरण घालून झाकण्यात आले आहे. गळतीमुळे जुन्या इमारतीचीही स्थिती बिकट आहे.
शिवोली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत १९८८ साली बांधण्यात आली होती. मार्ना-शिवोली, ओशेल-शिवोली, सडये-शिवोली, वेर्ला-काणका, गिरी, पर्रा, आसगाव, हणजूण-कायसूव या गावातील ग्रामस्थांसाठी आरोग्यसेवा तत्कालीन सरकारने उपलब्ध करून दिली होती.
वाढती लोकसंख्या आणि पर्यटकांमुळे सध्याची आरोग्य केंद्राची जागा अपुरी पडू लागली आहे. शिवाय अत्याधुनिक आरोग्य सुविधा याठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी केली. त्यामुळे विद्यमान इमारतीच्या मागच्या बाजूला नवीन विस्तारित आरोग्य विभागाची इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला व २००९ मध्ये या इमारतीचे बांधकाम हाती घेतले.
मात्र, कंत्राटदाराने प्रकल्प सोडून दिल्यामुळे या कामाची निविदा पुन्हा काढण्यात आली. विविध कारणांमुळे हा प्रकल्प १५ वर्षे रखडला गेला. अखेर चालू वर्षी जानेवारी २०२४ मध्ये या इमारतीचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. परंतु पाऊस सुरू झाल्यानंतर इमारतीला गळती लागली.
इमारतीला अनेक दिवसांपासून गळती लागलेली आहे. छत तातडीने दुरूस्त करण्याची गरज आहे. आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीची परिस्थिती बिकट आहे. यावर तात्पुरता उपाय पुरेसा नाही, असे एका रहिवाशाने सांगितले.
आरोग्य केंद्राच्या दोन्ही इमारतीची परिस्थिती बिकट असल्याची पुष्टी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. आरोग्य खात्याला याबाबतची कल्पना देण्यात आली आहे. शिवाय दुरूस्तीचे आवश्यक काम हाती घेण्याबाबत साबांखाच्या इमारत विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या छताला गळती लागल्याने इमारतीमध्ये ओलसरपणा दिसून येत आहे. शिवाय शौचालय व फरशीच्या बांधकामात समस्या दिसून येत आहे, असे मार्ना पंचायतीचे व्हिडीसी संयोजक ज्योकीम बार्रोस यांनी सांगितले.