पणजीत कांदे, लसणाचे दर वाढले

भाज्यांच्या दरात वाढ : कर्नाटकातून कमी झाली आवक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
09th September 2024, 11:58 pm
पणजीत कांदे, लसणाचे दर वाढले

पणजी : गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोमवारी पणजी बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली. बाजारात लसणाचे दर ८० रुपयांनी वाढून ४८० रुपये किलो झाले. तर कांदा, टोमॅटो आणि बटाट्याचे दर प्रत्येकी १० रुपयांनी वाढून अनुक्रमे ७०, ४० आणि ६० रुपये झाले. कर्नाटकातून कमी झालेली आवक तसेच गणेश चतुर्थीच्या सणामुळे पुढील काही दिवस भाज्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


सोमवारी पणजी बाजारात कोथिंबिरीची एक जुडी ५० रुपयांना होती. वालपापडीचे दर १०० रुपयांनी वाढून २०० रुपये किलो झाले. मध्यम आकाराचा लिंबू ७ रुपयांना एक या दराने विकला जात होता. आल्याचे दर १६० रुपये किलो होते. शेवगा, दोडका, ढब्बू मिरची आणि मिरची प्रत्येकी १२० रुपये किलो होती. वांग्याचे दर २० रुपयांनी वाढून होऊन ८० रुपये किलो झाले. भेंडी आणि कारल्याचे दर प्रत्येकी ८० रुपये किलो होते.

कोबी ४० रुपये प्रती किलो तर फ्लॉवरचा एक नग ५० रुपये होता. दुधी भोपळ्याचे दर १० रुपयांनी वाढून ६० रुपये किलो झाले होते. गवार ६० रुपये तर काकडी आणि गाजर ८० रुपये किलो दराने विकली जात होती. बाजारात पालेभाज्यांचे दर मागील आठवड्यापेक्षा जास्त होते. मेथी ३० रुपये, शेपू २५, तांबडी भाजी १५ रुपये तर पालक आणि कांद्याची पात १० रुपये एक जुडी या दराने विकले जात होते. फ्लॉवरच्या एका नगाचा दर ३५ रुपये होता.