पत्रकार माळगीमनी यांनी केले गणेश पूजन
पेडणे : गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर प्रत्येक हिंदू धर्मातील गणेश भक्त आपल्या घरात गणेश पूजन करत असतो. परंतु कोरगाव येथील मुस्लिम समाजातील एक युवा पत्रकार मकबूल माळगीमनी आपल्या निवासस्थानी मागच्या सहा वर्षांपासून गणेश पूजन करीत आहे. सर्वधर्मसमभाव त्याने आपल्या या कृतीतून दाखवून दिला आहे.
आज काल हिंदू -मुस्लिम वाद सुरू असतात. परंतु पेडणे तालुक्यातील कोरगाव या ठिकाणी युवा पत्रकार मकबूल याने आपल्या निवासस्थानी श्री गणेशाचे पूजन करून एक पायंडा पाडला आहे.
एका मुस्लिम समाजातील युवा पत्रकाराने आपल्या घरी चक्क गणेश पूजन केल्याची वार्ता राज्यभर पसरली. अनेक नागरिकांनी त्याच्या घरी श्रींचे दर्शन घेतले.
मकबूल याला बालपणापासून गणेशाचे आकर्षण होते. मात्र, स्वतःची नवीन वास्तू नसल्यामुळे गणपती बसवायचा कुठे? हा त्याच्या मनात प्रश्न होता. शिक्षक परशुराम गावडे या कुटुंबीयांनी त्यांना शंभर चौरस मीटर जागा कोणताही मोबदला न घेता दिली. आणि त्या ठिकाणी सुंदर अशी वास्तू मकबूल याने उभारली. त्याची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली. त्याने नवीन वास्तूत गणेश पूजन केले.
सुरुवातीला दीड दिवस गणपती ठेवला होता. परंतु बहिणीच्या हट्टापायी नंतर पाच दिवस ठेवला.
मकबूल माळगीमणी याचे मूळ कुटुंब हुबळी येथील आहे. त्याचे वडील गवंडी काम करण्यासाठी गोव्यात ३० वर्षांपूर्वी आले होते. मकबूल शाळेत जायचा त्यावेळीपासून त्याला गणपतीचे आकर्षण होते. दरवर्षी चतुर्थीला तो आपल्या वडिलांना म्हणायचा की, बाबा यंदा आम्ही घरी गणेश आणून पूजन करूया. बाबा मग मकबूलची समजूत काढायचे, ज्यावेळी तू स्वतः घर बांधशील किंवा स्वतःची वास्तू बांधणार त्यावेळी तू घरी गणेश पूजन कर. मकबूल लहान असतानाच त्याचे वडील आजाराने वारले.
मकबूल यांच्या आईने त्यांना शिक्षण दिले. तिने लोकांच्या घरात भांडीधुंडी करत मुलाबाळांचा सांभाळ केला. मकबूल यानेही विद्यार्थी असताना मिळेल ते काम करत आपले शिक्षण घेतले. मागील पंचवीस वर्षांपासून ते भाड्याच्या खोलीत राहायचे.
सहा वर्षांपूर्वी त्यांची सुंदर अशी वास्तू तयार झाली. पहिल्यांदाच त्याने दीड दिवसाचे गणेश पूजन केले. त्यानंतर पाच दिवस आणि यंदा सहाव्या वर्षी दीड दिवस गणेश पूजन केले.
लहानपणापासून गणेश पूजन करायची इच्छा होती. माझे पूर्वज व माझे आजोबा पूर्वी गणेश पूजन करायचे.काही काळानंतर ते थांबले. गणेश पूजन करताना अनेक विघ्ने आली. पण मी कोणाचेही न ऐकता मनाप्रमाणे केले. मानवता हा एकच धर्म असून त्यापलीकडे कोणताच धर्म नाही, असे मकबूल माळगीमनी याने सांगितले.