शिक्षण खाते : ८५ पूर्व प्राथमिक शिक्षक, १२ करिअर कौन्सिलरांचा समावेश
पणजी : शिक्षण खात्यातर्फे समग्र शिक्षा अंतर्गत ९७ जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये ८५ पूर्व प्राथमिक शिक्षक तर १२ करिअर कौन्सिलरांचा समावेश आहे. पूर्व प्राथमिक शिक्षक पदांसाठी दि. १७ तर कौन्सिलर पदांसाठी १८ रोजी पर्वरी शिक्षण खात्याच्या कार्यालयात सकाळी ९.३० वा. मुलाखती होणार आहेत.
पूर्व प्राथमिक शिक्षकांच्या पदांसाठी ८५ पैकी ५८ जागा खुल्या, १५ ओबीसी, २ एससी तर १० एसटी प्रवर्गासाठी असणार आहेत. या पदासाठी महिन्याला ७ हजार रुपये वेतन देण्यात येईल. करिअर कौन्सिलर पदाच्या १२ पैकी ९ खुल्या, २ ओबीसी तर १ एसटी प्रवर्गासाठी असेल. या पदासाठी महिन्याला २५ हजार रुपये वेतन असणार आहे. ही दोन्ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील.
पूर्व प्राथमिक शिक्षकाच्या पदासाठी ५० टक्क्यांनी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डीईसीएड किंवा बीएड (नर्सरी) असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी सहा महिने शिक्षक म्हणून किंवा अप्रेंटीशीप म्हणून काम केले असावे. कौन्सिलर पदासाठी पदवीसह करिअर कौन्सेलिंगमध्ये पदविका घेतलेली असावी किंवा मानसशास्त्र विषयात एमए केलेले असावे. या पदासाठी उमेदवाराकडे एक ते पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी ‘वॉक इन इंटरव्यू’साठी किमान अर्धा तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. दहा नंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश मिळणार नाही. उमेदवारांनी रहिवासी दाखल्यासह अन्य आवश्यक कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी www.scert.goa.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन समग्र शिक्षाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.
सागरमित्रसाठी ८ जागा
मत्स्योद्योग खात्यातर्फे सागरमित्र या पदासाठी ८ जागांवर भरती केली जाणार आहे. या जागा सहा महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने भरल्या जातील. यासाठी १५ हजार रुपये वेतन आहे. पदासाठी फिशरी, मरीन, जैवशास्त्र किंवा प्राणीशास्त्र विषयात पदवी असणे आवश्यक आहे. याबाबत खात्याच्या अधिकृत संकेतस्थळवर अधिक माहिती उपलब्ध आहे.