केली धार्मिक स्थळांवर दगडफेक, दुकानांचीही जाळपोळ. पोलिसांनी इंटरनेट बंद करत कर्फ्यू लावला.
जैनूर: देशात महिलांवरील अत्याचारात लक्षणीय वाढ झाली असून, कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात जनतेत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कोलकाता-बदलापूर-पुणे-पाटणा येथील घटना ताज्या असतानाच तेलंगणातील जैनूर येथील नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे जनता क्षुब्द्ध झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील एका ४५ वर्षीय आदिवासी महिलेवर प्रथम बलात्कार करून नंतर तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तेलंगणातील कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील जैनूर येथे घडलेल्या या घटनेनंतर, आदिवासी समाज रस्त्यांवर उतरला असून आदिवासी संघटनांनी निदर्शने सुरू केली आहेत. बुधवारी (४ सप्टेंबर) सकाळी सुरू झालेल्या या निदर्शनाचे दुपारपर्यंत दोन गटांमध्ये हाणामारीत रूपांतर झाले. आरोपी आणि पीडिता वेगवेगळ्या धर्माचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी धार्मिक स्थळांवर दगडफेकही करण्यात आली.
सुमारे २ हजार आंदोलक आदिवासींनी आरोपी समाजाच्या लोकांवर हल्ला केला. त्यांच्या धार्मिक स्थळावर दगडफेक केली. दुकानेही जाळली. प्रत्युत्तर म्हणून आरोपींच्या समुदायातील लोकांनीही जाळपोळ आणि दगडफेक केली.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जैनूर शहरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS)च्या कलम १६३ अन्वये संचारबंदी लागू करत आली आहे. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून प्रशासनाने परिसरातील इंटरनेट बंद करून पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत जलद कृती दलाला पाचारण करून परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. पोलिसांनी संध्याकाळी उशिरा माहिती जारी करत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले, परंतु अद्याप संचारबंदी उठवण्यात आलेली नाही.
हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी उचलले महत्वपूर्ण पाऊल
इंटरनेटवर बंदी घालत परिसरात संचारबंधी लादल्यानंतर दोन्ही समाजातील ज्येष्ठांशी चर्चा करण्यात आली. आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती दोन्ही समुदायांना देत पोलिसांनी शांततेचे आवाहनही केले. या परिसरात पोलिसांची सतत गस्त सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंसाचाराच्या तपासासाठी एक विशेष पथकही तयार करण्यात आले आहे. हे पथक गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे
४ दिवसांपूर्वी एका ऑटोचालकाने बलात्कार करून खून करण्याचा प्रयत्न केला होता, पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी एका ऑटोचालकाने ४५ वर्षीय आदिवासी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. महिलेने आरडा ओरडा केला असता आरोपीने तिच्या तोंडावर व डोक्यावर काठीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. महिला बेशुद्ध झाल्यावर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी महिलेला जैनूर रुग्णालयात दाखल केले, तेथून तिला पुढील उपचारासाठी हैदराबादला नेण्यात आले. महिला शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात आला. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध लैंगिक छळ, खुनाचा प्रयत्न आणि एससी/एसटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.