बेळगाव-गोवा व्यापाराला खराब रस्ते, छळवणूकीचे ग्रहण

बेळगाव प्रशासनाने 'अशा' प्रथा बंद कराव्यात- अभय पाटील, भाजप आमदार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th September 2024, 12:29 am
बेळगाव-गोवा व्यापाराला खराब रस्ते, छळवणूकीचे ग्रहण

बेळगाव : उत्पादित मालाची देवाणघेवाण आणि भाजीपाल्याचा दैनंदिन पुरवठा सुलभ करणाऱ्या व्यापारी वर्गाला खराब रस्ते आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या सततच्या तपासणी निमित्ताने होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

याविषयी भाजप आमदार अभय पाटील यांनी पोलीस प्रशासनाला प्रकार थांबवण्याची विनंती केली आहे. दर आठवड्याला ५००० हून अधिक खाजगी वाहने गोव्यातून बेळगावमध्ये खरेदीसाठी येत असतात. त्याला फक्त वाहतूक अधिकाऱ्यांच्या अवाजवी तपासणीला सामोरे जावे लागते. तेव्हा बेळगाव प्रशासनाने अशा प्रथा बंद कराव्यात, अशी विनंती भाजप आमदार अभय पाटील यांनी केली आहे.

अनमोड ते रामनगर आणि चोर्ला घाटा हे रस्ते मालवाहतूकीसाठी प्रामुख्याने वापरले जातात. मात्र हेच रस्ते व्यवस्थित नसल्याने वाहतुकीसाठी मोठे अडसर बनले आहेत. अलीकडेच या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (जीसीसीआय) आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (बीसीसीआय) यांनी एकत्रित प्रयत्न करण्याकरिता चर्चा करण्यासाठी बेळगाव येथे द्विपक्षीय बैठक घेतली होती.

यावेळी बोलताना जीसीसीआयच्या रसद (लॉजिस्टिक कमिटी) समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गावस म्हणाले, बेळगाव स्थित काही कंपन्यांनी रस्त्याच्या खराब परिस्थितीमुळे गोव्याच्या बंदरातून आयात माल आणणे बंद केले आहे. त्याऐवजी त्यांनी मंगळूर येथून माल आणण्याचा निर्णय घेतला आहे.

गोव्यातील मोपा विमानतळ आणि दुसरीकडे बेळगावमधील आयटी पार्क आणि संरक्षण उत्पादन संकुल या सर्वांसाठी चांगल्या प्रकारच्या रस्ते जोडणीची गरज असल्याची मागणी होत आहे.

बेळगाव दक्षिणचे भाजप आमदार अभय पाटील यांनी या पायाभूत सुविधांमधील तफावत दूर करण्याबाबतच्या चर्चेवर भर दिला असून मोपा ते बेळगाव दरम्यानच्या रस्त्याचे तिलारी घाटमार्गे रुंदीकरण करण्याविषयी त्यांनी चर्चा केली आहे.

याव्यतिरिक्त बेळगाव ते गोव्यात भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना गोव्याच्या अधिकाऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो. ज्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील व्यापाराची गतिशीलता आणखी गुंतागुंतीची होत आहे. ही आव्हाने कमी करण्यासाठी आणि बेळगाव आणि गोवा यांच्यातील व्यापाराचा ओघ सुधारण्याकरीता उपाय शोधण्यासाठी जीसीसीआय आणि बीसीसीआय या चेंबर्सनी एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे.