म्हापसा: म्हापशातील खड्डेमय रस्त्यांमुळे गणेशोत्सव काळात लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे. हा त्रास कमी व्हावा या हेतूने सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे पुढे सरसावले असून त्यांनी म्हापसेकरांसाठी रस्ता हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. या हेल्पलाईनवर खड्ड्यांचा फोटो व जागा नमूद केल्यानंतर सदर खड्डा स्वखर्चाने बुजवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत हा हेल्पलाईन क्रमांक त्यांनी जाहीर केला. यावेळी सीतेश मोरे, विनेश नाईक व सूरज कांबळी हे उपस्थित होते.
बर्डे म्हणाले की, लोकांना चांगले रस्ते उपलब्ध करुन देण्यात मुख्यमंत्री आणि सरकार हे सपशेल अपयशी ठरले आहेत. खड्ड्यांच्या दुर्दशेसाठी सरकारकडून पावसाचे निमित्त पुढे केले जात आहे. मात्र गोव्यात दरवर्षीच मुसळधार पाऊस पडतो. सरकार आपल्या सगेसोयर्यांना रस्त्यांचे कंत्राट देते. या कंत्राटदारांकडून दर्जाहिन रस्त्यांचे निर्माण केले जाते. यामुळेच रस्त्यांवर खड्डे पडतात अशा टीका त्यांनी केला.
म्हापसा मतदारसंघाच्या आमदारांना लोकांना होणारा त्रास दिसत नाही. यामुळेच मी स्वखर्चाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्या परिसरात गणेश विसर्जन केले जाते, त्या भागांतील रस्त्यांवरील खड्डे प्रथम बुजवले जातील. तसेच लोकांच्या तक्रारीनुसार इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, असेही बर्डे म्हणाले.