पर्वरी उड्डाणपुलाच्या कामाबाबत आज वाहतूक चाचणी

जुना बाजार, तीन बिल्डींग येथील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th August 2024, 12:27 am
पर्वरी उड्डाणपुलाच्या कामाबाबत आज वाहतूक चाचणी

सुकूर येथील पर्वरी जुना बाजार जंक्शनवरील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेली व्यवस्था. (उमेश झर्मेकर).

म्हापसा : पर्वरी येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित उड्डाणपुलाच्या कामासाठी पर्वरी जुना बाजार जंक्शन व तीन बिल्डींग जंक्शनवरील वाहन वाहतूक व्यवस्थापनाची प्रात्याक्षिक चाचणी सोमवारी १२ रोजी वाहतूक पोलिसांतर्फे केली जाणार आहे. यासाठी दोन्ही जंक्शनवरील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवली जाणार आहे.
या उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर हाती घेण्याच्या दृष्टीने सरकारने हे पाऊल उचलले आहे. गेल्या ७ ऑगस्टपासून पुलाचे काम हाती घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण पोलिसांनी विशेषत: महामार्गावरील वाहन वाहतूक व्यवस्थापनाचा प्रश्न उपस्थित केल्यामुळे हे काम पुढे ढकलण्यात आले होते.
सोमवारी सकाळपासून दिवसभर पुलाच्या कामासंदर्भात महामार्गावरील वाहन वाहतूक व्यवस्थापनाची प्रात्याक्षिक चाचणी घेतली जाणार असून वरील दोन्ही जंक्शनची वाहन वाहतूक सर्व्हिस रोडवर वळली जाणार आहे. यासाठी पर्वरी जुना बाजार जंक्शनजवळ गिरीच्या बाजूने दोन्हीकडे सर्व्हिस रोडवर काँक्रिट घालून डायर्व्हजन फलक उभारले आहे. तर तीन बिल्डींग जंक्शनवरील म्हापसा ते पणजीची वाहतूक डाव्या बाजूच्या सर्व्हिस रोडवर वळविण्यात येणार आहे. यासाठी तिथेही डायर्व्हजन फलक व महामार्ग ते सर्व्हिस रोड रस्ता काँक्रिट घालून जोडण्यात आला आहे.
या वाहन वाहतूक व्यवस्थापनासाठी सोमवारी सकाळपासून पर्वरी वाहतूक पोलीस सेलसह उत्तर गोव्यातील सर्व वाहतूक पोलीस सेलचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दोन्ही जंक्शनच्या दरम्यान तैनात असणार आहे. शिवाय साबांखाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तैनात असतील.
उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष काम हाती घेतल्यानंतर महामार्गावरील वाहन वाहतूक व्यवस्थापनावर कोणता ताण पडेल. वाहन वाहतूक सुरळीत होण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवता येईल, याचा अभ्यास या चाचणीवेळी केला जाणार आहे.

पर्वरी उड्डाणपुलाच्या कामासाठी महाराष्ट्रातून पत्रादेवी मार्गे म्हापशाकडे येणारी अवजड वाहन वाहतूक बांदा, दोडामार्ग ते डिचोली या मार्गावर. तर दक्षिण गोव्यातून पणजीकडे येणारी वाहतूक त्याच मार्गे पुन्हा वळवावी. तसेच चोर्लाघाट मार्गे म्हापसा पणजीकडे मार्गावर येणारी वाहतूक साखळी-माशेल मार्गे वळवण्याची अधिसूचना राज्य सरकार तसेच सिंधुदुर्ग व बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांद्वारे सोमवारीच जारी केली जाईल. राज्य सरकारकडून याबाबतीत सिंधुदुर्ग व बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सूचनापत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.