जे जे म्हणून काही डोळ्यांनी पाहशील, कानांनी ऐकशील, मनाने कल्पना करशील किंवा मुखाने उच्चारशील ते सगळे मद्रूपच होऊ दे. मग स्वभावतःच मीच एक अंतर्बाह्य तुझ्यात भरून राहिलेला असेन. मग अशा स्थितीत जरी देह पडला, तरी खरे तर तो मरत नाहीच. असे जर आहे, तर मग आता मला सांग की तुला या युध्दाची भीती वाटण्याचे काही कारण राहते का?
अंतकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशय: ।।५।।
सरळ अर्थ : जो पुरुष अंतकाळी माझेच स्मरण होताच शरीर सोडून जातो, तो माझ्या (साक्षात्) स्वरूपाला प्राप्त होत असतो यात काहीच संशय नाही.
विस्तृत विवेचन : अर्जुना, मी तुला आत्ताच सांगितले की ज्याला 'अधियज्ञ' असे म्हणतात त्या मला जे आधीच व अंतकाळीही जाणतात त्यांना मडक्याच्या आतले आणि बाहेरचे आकाश जसे एकच आहे आणि मडक्याचा आकार हा फक्त मातीने साकारलेला आहे, त्याप्रमाणे देह हा मिथ्या असून आत्मतत्व बाह्याभ्यंतरी एकच असल्याची स्पष्ट जाणीव असते. त्यांच्या प्रतितीच्या माजघरात माझ्या व त्यांच्या एकपणाच्या जाणिवेची जागा निश्चित स्वरूपाची असते. या एकपणाच्या बाहेरील विषयांचा त्यांना विसर पडलेला असतो. ही सबाह्य एकता भोगत मद्रूप झालेलेच त्यांचे अस्तित्व असते. या निश्चित स्वरूपाच्या एकरूपतेमुळे बाहेरची पंचमहाभूतांची खवले कधी व कशी गळून पडली हे त्यांना कळत देखील नाही. अशारीतीने देह उभा असताही ज्यांना त्याचे भान नसते त्यांना तो देह जरी पडला तरी त्याचे संकट वा अप्रूप ते काय असणार? म्हणून अशा त्या त्यांची स्वरूपानुभूती, हे धनंजया, कल्पातीतही ढळत नाही!
ती स्वरूपानुभूती जणू ऐक्यरसाचीच असून अखंडपणाच्या हृदयात ओतून जणू सामरस्याच्या सागरात निभ्रात धुऊन काढली आहे! त्यामुळे तिथे काम-क्रोधादी मनो-मळांना स्थानच नाही! अथांग पाण्यात असलेल्या मडक्याच्या आत व बाहेरही पाणी असते. मग ते मडके फुटले तर त्यामुळे ते पाणी सुध्दा भंगेल काय? उष्णता फार वाढली म्हणून एखाद्याने अंगावरील कपडे काढून बाजूला ठेवले किंवा एखाद्या सर्पाने कात टाकली म्हणून काय त्या व्यक्तीचे अथवा सर्पाचे शरीर भंगते काय? तसा शरीर नावाचा हा पंचमहाभूतांचा (कपड्यांसारखा) जो भ्रामक आकार आहे, तो जरी लोप पावला तरी ब्रह्म हे एकच नित्य व शाश्वत आहे आणि सगळीकडे ओतप्रोत भरून राहिलेले आहे! ते लोप पावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही!
आता बुद्धीही ब्रह्मरूप झालेली असताना ती तरी अंतकाळी कशी डगमगेल? म्हणून जे अंतकाळी मला सहजपणे अशारीतीने जाणून सावध होऊन देह सोडतात, ते नि:संदेह मद्रूपच होतात. एरव्ही सुध्दा जो जो अंतकाळी आपल्या अंतरात जे काही स्मरतो तशीच त्याला पुढील गती निश्चित मिळते, यात संशय नाही.
त्याचे असे आहे की, कोणी एखादा दीनवाणा जीवाच्या आकांताने बेभान होऊन धावत असताना जर दुर्दैवाने वेग न आवरता आल्याने अकस्मात पाय घसरून खोल विहिरीत पडला, तर अशा परिस्थितीत तसे पडणे टाळण्यासाठी त्याच्याकडे काहीच साधन नसल्याने विहिरीत पडणे त्याला भागच असते. तसेच अंतकाळी जीवाच्या मनात जे काही असेल तत्स्वरूपच ओघाने त्याला पुढे व्हावे लागते. ते तसे व्हायचे चुकत नाही! जागृत स्थितीत असताना ज्या वस्तूचे, गोष्टीचे किंवा विषयाचे सतत चिंतन मनात चालू असते तेच झोपल्यावर स्वप्नात दिसते.
यं यं वाsपि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित: ।।
तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुध्दिर्मामेवैष्यस्यसंशयम् ।।७।।
सरळ अर्थ : हे कौन्तेया, हा पुरुष अंतकाळी ज्या ज्या काही भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्या त्याच भावाला सदा त्या भावाचेच चिंतन करीत असल्यामुळे प्राप्त होतो. कारण मनुष्य सदा ज्या भावाचे चिंतन करीत असतो, अंतकाळीही प्राय: त्याचेच स्मरण त्याला होत असते. यासाठी हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युध्दही कर. याप्रमाणे माझ्या ठिकाणी अर्पण केलेल्या मन बुध्दीने युक्त झालेला असा तू नि:संशय मलाच प्राप्त होशील.
विस्तृत विवेचन : जीवाला जन्मभर ज्या गोष्टीचे ध्यान असते त्या गोष्टीपाशीच त्याचे मन आवडीने रमते. मग शेवटपर्यंत ते ध्यान (आवड) खूप होऊन त्या जीवाचे अंतरंग पूर्णपणे व्यापून राहते आणि अंतकाळी ज्याला जे आठवते त्याला तीच गती प्राप्त होते हे नक्की! म्हणून तू सदासर्वकाळ फक्त मलाच आठव. माझेच स्मरण कर. जे जे म्हणून काही डोळ्यांनी पाहशील, कानांनी ऐकशील, मनाने कल्पना करशील किंवा मुखाने उच्चारशील ते सगळे मद्रूपच होऊ दे. मग स्वभावतःच मीच एक अंतर्बाह्य तुझ्यात भरून राहिलेला असेन. मग अशा स्थितीत जरी देह पडला, तरी खरे तर तो मरत नाहीच. असे जर आहे, तर मग आता मला सांग की तुला या युध्दाची भीती वाटण्याचे काही कारण राहते का?
हे पंडू सुता, तुझी बुध्दी आणि मन सर्वथा मला समर्पित झाली की नि:शंकपणे तू मीच होशील हे माझे आश्वासन व वचन आहे. असे घडणे कसे शक्य आहे ही शंका जर तुझ्या मनी येत असेल, तर हे जे मी सांगतोय ते नीट अभ्यासून प्रत्यक्ष करून बघ आणि त्यातून मी सांगतो तसे नाही झाले तर मग खुशाल मला दोष दे.
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ।।८।।
सरळ अर्थ : आणि हे पार्था, असा नियम आहे की, परमेश्वराच्या अभ्यासरूप योगाशी युक्त होऊन दुसऱ्या कशाकडेही न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा पुरुष परमप्रकाशस्वरूप दिव्य पुरुषाला अर्थात् परमेश्वरालाच प्राप्त होतो.
विस्तृत विवेचन : पार्था, चित्ताची व्यवस्थित सांगड अशा अभ्यासाशी घालावी जेणेकरून प्रयत्नांच्या बळे पांगळा सुध्दा पर्वताच्या टोकापर्यंत चढू शकेल. तसे तू सोsहं भावाने परात्पर पुरुषाचे चिंतन रात्रंदिवस कर. मग तुझा देह जावो अथवा राहो, मृत्यू तुझा कल्पान्तीही होणार नाही. तुझे चित्त असे घडव की ते कोणत्याही गतींनी जरी गेले, तरी शेवटी आत्म्यालाच वरेल. एकदा का चित्त आत्म्यात जाऊन स्थिरावले की मग पार्था, देहाची मोजणी ती काय राहते? तो आहे किंवा नाही हे आठवण्याचाही प्रश्न उद्भवत नाही! नदीतून वाहत समुद्राला मिळून सिंधुरूप झालेले पाणी मागे नदीत काय घडत आहे, ते बघायला कधी परत येते का? तसे त्या चित्ताचे चैतन्याला मिळून अनन्य असे चैतन्य झाले की मग ते परिपूर्ण असे आनंदरूपच असते. तिथे परत जन्ममरणाचा शीण उद्भवत नाही.
मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल
असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३