कवठणकरांकडून समर्थन; पाटकरांना न बोलावल्याने इतर नेत्यांचा विरोध
पणजी : राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपताच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी आयोजित केलेल्या कुडचडेतील आजच्या 'संडे डायलॉग' या संवाद कार्यक्रमावरून प्रदेश काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी या कार्यक्रमाचे स्वागत केल्याने प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह बहुतांशी काँग्रेस नेत्यांत नाराजी पसरली आहे.
आमदार विजय सरदेसाई यांच्या 'संडे डायलॉग'चा फायदा ‘इंडिया’ गटाला होण्याचा दावा सुनील कवठणकर यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्यानंतर, विजय सरदेसाईंनी कुडचडेत कार्यक्रम करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना विश्वासात न घेतल्यामुळे या कार्यक्रमामागे छुपे राजकारण असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मोरेनो रिबेलो यांनी केला होता. त्यानंतर आपण आमदार असण्यासह एका राजकीय पक्षाचा अध्यक्षही आहे. राज्यभरातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठीच 'संडे डायलॉग'चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात कुणाला वाईट वाटून घेण्याचा प्रश्नच नाही. पुढील ३ वर्षे अशाच पद्धतीने जनतेसमोर जाण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी ठाम भूमिका आमदार सरदेसाई यांनी मांडली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी गत विधानसभा निवडणूक कुडचडे मतदारसंघातून लढवली होती. त्यात त्यांचा नीलेश काब्राल यांनी अवघ्याच मतांनी पराभव केला होता. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत कुडचडेतून निवडून येण्यासाठी अमित पाटकर यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केलेले असतानाच 'इंडिया' आघाडीला समर्थन दिलेल्या गोवा फॉरवर्डच्या आमदार सरदेसाईंनी कुडचडेत 'संडे डायलॉग'चे आयोजन केल्याने आणि या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या सुनील कवठणकर यांनी समर्थन दिल्याने काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी पुन्हा उफाळून आली आहे.
काँग्रेसचा कवठणकरांना एक सवाल!
मनाने काँग्रेसमध्ये आणि आरएसएस, भाजप विचारधारेविरोधात असलेली व्यक्ती आरएसएस कार्यकर्ते, भाजप आमदार नीलेश काब्राल यांचे निकटवर्तीय असलेल्या आमदार विजय सरदेसाई यांच्या कुडचडेतील आजच्या 'संडे डायलॉग'चा प्रचार कसा करू शकते, असा सवाल काँग्रेस सरचिटणीस श्रीनिवास खलप यांनी सुनील कवठणकर यांचे नाव न घेता सोशल मीडियाद्वारे केला आहे. याला कवठणकर काय उत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.