म्हापसा : भाटीवाडा नेरूल येथे सिलिंडरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाल्यामुळे जया जीवन शिरोडकर (५०) व दिलेश जीवन शिरोडकर (२१) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर सध्या गोमेकॉत उपचार सुरू आहे. गॅस गळतीनंतर झालेल्या स्फोटात घराच्या खिडकीच्या काचा फुटून १५ मीटर पर्यंत उडाल़्या. स्फोटामुळे वाड्यावरील लोक हादरले.
ही घटना रविवारी सकाळी ७: ४५च्या सुमारास घडली. शिरोडकर यांचे हे घर एका खोलीचेच आहे. जखमी आई व मुलगा घरात झोपले होते. जया या सकाळी झोपेतून उठल्या व चहा करण्यासाठी त्यांनी गॅस पेटवला. लायटर पेटवताच आगीचा भडका उडाला व त्या जमिनीवर कोसळल्या. मुलगा दिलेश हा देखील बिछान्यावरून खाली कोसळला व दोघेही आगीत होरपळले. स्फोट होताच खिडक्यांवरील काचा फुटून बाहेर उडाल्या व दरवाजाही तुटून बाहेर पडला. मात्र सुदैवाने या फुटलेल्या काचा अन्य कुणाला लागल्या नाहीत.
शिरोडकर यांच्या घरातून मोठा आवाज येताच शेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत होरपळून घरात जखमी अवस्थेत पडलेल्या आई व मुलाला उचलून त्यांनी कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथून त्यांना गोमेकॉत पाठवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जया शिरोडकर या ३० टक्के तर मुलगा दिलेश हा २० टक्के भाजला आहे. घटनेची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाचे जवान तसेच पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घरातील सामान जळत होते. दलाचे हलावदार नरेंद्र शेटये, परेश गावस, भावेश शिरोडकर, जितेंद्र बली, व दत्तप्रसाद सिनारी या जवानांनी ही आग विझवली. अग्निशमन दलाचे उपअधिकारी राजेंद्र हळदणकर व पिळर्णचे अधिकारी दामोदर पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, या आगीत शिरोडकर कुटूंबियांच्या घरातील संपुर्ण सामान जळाले आहे. तसेच घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अंदाजे ५ ते १० लाखांची हानी या दुर्घटनेत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जखमी झालेल्या दोघांचीही जबानी घेतल्यानंतर नुकसानीचा आकडा स्पष्ट होणार आहे. तीन महिन्यांपुर्वी दिलेश शिरोडकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर आई व मुलगा दोघेच घरात राहत होते. दिलेश हा इंजिनीअरींगचे शिक्षण घेत आहे.