आरोपीकडून ७८ हजार रूपये किमतीचा ७८० ग्रॅम गांजा हस्तगत
वास्को: बायणातील एमपीटी मैदानाजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या वरुण पंजाबी( ३१, मूळ चेंबुर-मुंबई) याला वास्को पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून ७८० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला. या गांजाची किंमत ७८ हजार रूपये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १०) रात्री एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वास्को पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक प्रिस्ले कार्वालो यांच्या नेतृत्वाखाली वास्को पोलीस स्थानकाचे काही पोलीस तेथे लक्ष ठेऊन होते.रात्री आठनंतर तेथे आलेल्या एका व्यक्तीला संशयित हालचालीवरून ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे गांजा सापडला. कायदेशीर सोपस्कारानंतर त्याला रितसर अटक करण्यात आली.