टेबल टेनिसमध्ये जपानच्या हिरानोनेकडून ४-१ असा पराभव
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्राचे एकेरी टेबल टेनिस स्पर्धेतील आव्हान संपले. मनिका या ऑलिम्पिकमध्ये आता महिला दुहेरीत खेळताना दिसणार आहे. जपानच्या मिऊ हिरानोने उपउपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्राचा ४-१ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट बुक केले. पराभवानंतरही मनिका बत्राने प्री-क्वार्टर फायनल गाठून इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसमध्ये १६ची फेरी गाठणारी ती पहिली भारतीय ठरली.
एकेरी सामन्यात मनिका बत्राने पहिला गेम गमावला. फ्रान्सच्या मिउ हिरानोने पहिला गेम ११-६ असा जिंकला. मनिका दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात होती. दुसऱ्या गेममध्ये मनिकाकडे एका क्षणी ६-२ अशी आघाडी होती. मात्र, हिरानोने ६-६ अशी बरोबरी साधली. त्यानंतर मनिकाने शानदार पुनरागमन करत स्कोअर ९-९ असा बरोबरीत आणला. पण, यानंतर हिरानोला गेम पॉइंट मिळाला आणि हिरानोने दुसरा गेम ११-९ असा जिंकला.
तिसरा गेम जिंकून मनिकाचे पुनरागमन
तिसऱ्या गेममध्ये मनिका बत्रा एकवेळ ७-२ अशी पुढे होती. पण, हिरानोने शानदार पुनरागमन करत स्कोअर ९-९ असा केला. त्यानंतर मनिकाने तिसरा गेम १४-१२ असा जिंकून सामन्यात पुनरागमन केले.
चौथ्या गेममध्ये दोन्ही खेळाडू एक वेळ ६-६ असे बरोबरीत होते. मात्र, येथे हिरानोने ११-८ असा विजय मिळवला. शेवटच्या गेममध्ये मनिकाला पुढचा सामना जिंकावाच लागणार होता. मात्र, पाचव्या गेममध्ये मिऊ एकवेळ १०-६ अशी आघाडीवर होती. अखेर तिने हा सामना ११-६ असा जिंकून सामनाही खिशात घातला.
मनिका बत्राने ३२व्या फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या १२व्या मानांकित प्रितिका पावडेचा सरळ सेटमध्ये ११-९, ११-६, ११-९, ११-७ असा पराभव केला होता. टेबल टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून मनिकाने आधीच ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय आहे.