प्रशांत किशोर यांचा नवा पक्ष, नवा प्रयोग

एक नवा चेहरा म्हणून पाहताना, प्रशांत किशोर यांच्या अनोख्या कल्पना, प्रत्यक्ष अनुभव आणि डावपेचातील निपुणता याचा किती लाभ ते पक्षाला करून घेतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. देशातील जनता नेहमीच करिष्मा आणि नाविन्य यांची पाठराखण करण्यास उत्सुक असते, असे आम आदमी पक्षाबाबत देशाला दिसून आले होते. प्रशांत किशोर यांची वाटचाल सोपी नसली तरी ती अशक्य आहे, असे मानायचे कारण नाही.

Story: विचारचक्र |
01st August 2024, 12:27 am
प्रशांत किशोर यांचा नवा पक्ष, नवा प्रयोग

मोजक्या पक्षांचा अपवाद सोडला, तर देशात सारे पक्ष एनडीए आणि इंडी अशा दोन आघाड्यांमध्ये सहभागी झाले आहेत. यात विरोधकांची आघाडी एकसंध नसल्याचे अनेक वेळा जाणवते. तृणमूल काँग्रेस-डावे, काँग्रेस-आप अशा पक्षांना एकत्रित नांदणे कसे शक्य नाही, याचा प्रत्यय वारंवार येत असतो. दुसऱ्या पक्षाचे वर्चस्व सहन करणे काही पक्षांना मान्य नसते, हेही खरे. असे असले तरी देशातील मतदारांना दोन आघाड्यांपैकी एक निवडणे भाग पडते. याच आघाड्यांमधील घटक पक्षांना मते देण्यावाचून उपाय नसतो. या पार्श्वभूमीवर ज्यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखालील आम आदमी पक्ष स्थापन झाला, त्यावेळी जनतेच्या अपेक्षा अचानक वाढल्या. त्यास तसे कारण होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याला जनतेचे जसे समर्थन लाभले, त्याचप्रमाणे त्याच आंदोलनातून पुढे आलेल्या केजरीवाल यांना पाठिंबा मिळेल असा अंदाज व्यक्त होत असे. तो अनाठायी नव्हता. जनतेला तिसरा पर्याय लाभल्याचे समाधान वाटले, पण आपची आतापर्यंतची वाटचाल पाहता, जनतेच्या पदरात घोर निराशा पडली. सर्वांचेच पाय असे कसे मातीचे निघाले, असे कोडे जनतेला पडले. राजकीय हस्तक्षेप किंवा दबावाचे सोडा, न्यायालयांनी पुरेशा प्रथमदर्शनी पुराव्याच्या आधारे पक्षाध्यक्ष केजरीवाल यांच्यासह अन्य नेत्यांना सतत जामीन नाकारल्याने तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात तथ्य असल्याचे सिद्ध होत आहे. आरोप सिद्ध होणे ही त्यापुढची पायरी. सध्या आपली मंत्रिपदे न सोडता हे संशयित आरोपी गजाआड बसून सत्ता उपभोगत आहेत, हा तर कहरच आहे. याच कारणास्तव जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. ज्यांच्याकडून स्वच्छ प्रशासनाची अपेक्षा बाळगली, तेच अधिक भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज निपजले, हा जनतेच्या विश्वासाला गेलेला कायमचा तडा आहे. तो पुन्हा सांधला जाऊ शकत नाही. कोणतेही राजकीय कारण द्या किंवा सुडबुद्धीचे लेबल चिकटवा, संशयकल्लोळ माजवलेले नेते स्वच्छ, पारदर्शक नाहीत, याची खात्री जनतेला पटली आहे. या घोर निराशेतून जनता कशी सावरणार असा प्रश्न पडला असतानाच, नामवंत राजकीय विश्लेषक अशी प्रतिमा असलेल्या प्रशांत किशोर यांनी जनसुराज नावाच्या नव्या पक्षाची घोषणा करून पर्यायाच्या शोधात असलेल्या मतदारांच्या आशा नव्याने जागवल्या आहेत. सध्या बिहारवर लक्ष केंद्रित केलेल्या प्रशांत किशोर यांची भविष्यातील वाटचाल देशव्यापी बनली तर आश्चर्य वाटायला नको. अपेक्षा एवढीच की, प्रशांत किशोर यांनी केजरीवाल यांच्या गैरमार्गाने जाऊ नये. जनतेच्या पल्लवित झालेल्या आशा टिकाव्यात यासाठी पर्याय द्यावा. सध्याच्या सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीत काहीच फरक राहिलेला नसल्याने वेगळेपण असलेली जनसुराज पार्टी कशी वाटचाल करते, याकडे आता मतदारांचे लक्ष असेल. हा पक्ष १५५ व्या गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे कार्यरत होत आहे.

प्रशांत किशोर गेली काही वर्षे राजकीय रणनीतिकार म्हणून देशाला परिचित आहेत. बिहारमधील हजारो गावांमधून त्यांनी दोन वर्षे पदयात्रा काढल्या आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. येत्या दोन महिन्यांत लाखो कार्यकर्त्यांसमवेत विचारविनिमय करून पक्षाचे धोरण, प्राधान्यक्रम, संविधान आणि नेतृत्व यावर निर्णय घेतला जाईल असे सांगताना ते सर्व कार्यकर्त्यांना संस्थापक सदस्य असे संबोधतात. अशा सदस्यांची संख्या दीड लाख असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आपण कोणतेही पद स्वीकारणार नाही, असे स्पष्ट करताना कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून काम करताना नेतेपदासाठी चुरस नसेल, असे ते म्हणतात. आठ बैठका घेऊन निर्णय घेतले जाणार आहेत. बिहार विधानसभेची २०२५ ची निवडणूक नजरेसमोर ठेवून रणनीती आखली जाणार आहे. तसे पाहता, प्रशांत किशोर यांनी काही काळ जनता दल (यू)चे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते, मात्र नितीशकुमार यांच्याशी त्यांचे पटले नाही. त्यांचा कल भाजपकडे असल्याचे मानले गेले. काँग्रेस पक्षातही त्यांचा वावर फार काळ टिकला 

नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रारंभीच्या काळात विजय मिळवून देण्यात प्रशांत किशोर यांचा मोलाचा वाटा असल्याचे मानले जाते. अलीकडे त्यांनी लोकसभा निवडणुकीसंबंधात केलेले अंदाज चुकले होते. आता विधानसभेच्या २४३ जागा लढविण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला आहे. मोदी सरकारने ज्यांना भारत रत्न प्रदान केले ते ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पुरी ठाकुर यांच्या कन्या डॉ. जागृती ठाकुर यांनी नव्या पक्षात प्रवेश केला आहे. माजी आमदार व निवृत्त आयपीएस अधिकारी या पक्षात सामील झाले आहेत. जनरल, ओबीसी, मुस्लिम आदी पाच विभागांत पक्षाची रचना करण्यात येणार असून, त्यातील प्रत्येक विभागातील नेता एका वर्षासाठी पक्षाचे अध्यक्षपद भूषविणार आहे. नितीशकुमार यांनी यापूर्वी भाजप व राजद या पक्षांशी युती करून सरकारे स्थापन केली आहेत. या तिन्ही पक्षांना पर्याय देण्याचा मानस प्रशांत किशोर व्यक्त करतात. बिहारच्या प्रगतीसाठी नव्या पक्षाची गरज असल्याचे ते म्हणतात. गेली ३० वर्षे जनता त्रस्त असल्याचे अनुमान त्यांनी काढले 

आहे.

आपला पक्ष कसा वेगळा आहे, हे प्रशांत किशोर यांना जनतेला दाखवावे लागेल. बिहारमधील मतदारांशी त्यांनी आतापर्यंत साधलेला संपर्क त्यांना प्रोत्साहन देणारा आहे, असा त्यांचा दावा आहे. जनता पर्यायाच्या शोधात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. संयुक्त राष्ट्रात दहा वर्षे काम केल्यानंतर भारतात परतलेले प्रशांत किशोर यांनी गेले दशक केवळ अनुभव घेण्यात घालवले. केवळ सल्लागार अशी त्यांची भूमिका राहिली. एखादा कार्यकर्ता जसा कधी तरी नेता बनतो, त्याप्रमाणे प्रत्यक्ष राजकारण करण्याचा किशोर यांचा प्रयत्न किती यशस्वी होतो, ते येत्या दोन वर्षांत दिसेलच. एक नवा चेहरा म्हणून पाहताना, त्यांच्या अनोख्या कल्पना, प्रत्यक्ष अनुभव आणि डावपेचातील निपुणता याचा किती लाभ ते करून घेतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. देशातील जनता नेहमीच करिष्मा आणि नाविन्य यांची पाठराखण करण्यास उत्सुक असते असे प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे आपबाबत देशाला दिसून आले होते. प्रशांत किशोर यांची वाटचाल सोपी नसली तरी ती अशक्य आहे, असे मानायचे कारण नाही. बिहारमधील जातीव्यवस्था आणि तिचा प्रभाव यापासून दूर राहण्यात ते यशस्वी होतात की त्या स्थितीचा लाभ घेतात, हे येत्या काळात स्पष्ट होईल. बिहारमधील प्रयोगानंतर ते कदाचित अन्य राज्यांचा विचार करू शकतील.


गंगाराम केशव म्हांबरे 

(लेखक पत्रकार असून विविध विषयांवर 

लेखन करतात)

मो. ८३९०९१७०४४