शांतीनगर-नवे वाडे येथे आग लागून बस खाक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th July, 11:56 pm
शांतीनगर-नवे वाडे येथे आग लागून बस खाक

वास्को : शांतीनगर - नवेवाडे येथील गणपती मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत उभी करण्यात आलेल्या एका मिनीबसला शुक्रवारी पहाटे अचानक आग लागून बस पूर्णपणे जळाली. वास्को अग्निशमन दलाने प्रयत्न करून आग विझविली. दरम्यानच्या काळात बसचा बराच भाग जळाला. आग कशी लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही.

गणपती मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत काहीजण आपली वाहने उभी करतात. मिनी बसमालकाने गुरुवारी रात्री बस तेथे उभी केली होती. पहाटेच्या सुमारास त्या बसला आग लागल्याचे दिसताच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी एक तास प्रयत्न करुन आग विझविली. बस तेथील उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांखाली लावण्यात आली होती. त्यामुळे कदाचित आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बसचा आतील भाग पूर्णपणे जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.