गोवा माईल्सला नाहक प्रोत्साहन

आमदार मायकल लोबो यांची परिवहन खात्यावर टीका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th July 2024, 11:57 pm
गोवा माईल्सला नाहक प्रोत्साहन

पणजी : टॅक्सी उद्योग हा गोव्याचा व्यवसाय आहे. राज्यात १८,००० ते २०,००० टॅक्सी चालक असताना गोवा माईल्सला नाहक प्रोत्साहन देण्याचा अट्टाहास परिवहन मंत्री करत असल्याची टीका आमदार मायकल लोबो यांनी केली.
राज्यात बेरोजगारी वाढत असताना गोव्यातील उद्योगांमध्ये बहुतांश परदेशी लोक काम करत असल्याचा आरोपही लोबो यांनी केला.परिवहन, पंचायत आणि उद्योग विभागाच्या मागण्यांवर बुधवारी सभागृहात चर्चा झाली. या सर्व विभागांच्या कामगिरीवर आमदार मायकल लोबो यांनी टीका केली.परिवहन मंत्री मॉविन गुदिन्हो मंत्री आहेत. मात्र ते टॅक्सी चालकांचा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. गोवा माईल्स ॲप सेवेला आणि गोवा टॅक्सी ॲपला पर्यटनमंत्र्यांनी प्रोत्साहन दिले. यामुळे टॅक्सी व्यवसाय बाहेरच्या लोकांच्या हातात जाण्याची भीती आहे. गोमंतकीय चालकांनी टॅक्सी कर्ज काढून घेतल्या आहेत. त्याच्या हप्त्यांमुळे त्यांना व्यवसाय परवडत नाही. यामुळे काही टॅक्सी चालकांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते.
गोवा माइल्स ॲपमुळे स्थानिक टॅक्सी चालक दाबोळी विमानतळावर दिसत नाहीत. मोपा विमानतळावरही टॅक्सीचालकांत मारामारी सुरू आहे. यामुळे टॅक्सी ॲप्सची समस्या दूर करणे आवश्यक आहे. राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. राज्यामध्ये चार्जिंग स्टेशनची कमतरता आहे. चार्जिंग स्टेशन्स नसल्यास इलेक्ट्रिक कारचा काय फायदा, असे मायकेल लोबो म्हणाले.
पणजीसह सर्वच बसस्थानकांची अवस्था बिकट झाली आहे. स्मार्ट सिटी पणजी बसस्थानकात स्वच्छतागृहाची सोय नाही. म्हापसा तसेच इतर बसस्थानकांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे. बसस्थानकांची पाहणी करून दुरुस्तीची मागणी आमदार मायकल लोबो यांनी केली.गोव्यात नवीन उद्योग नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. गोव्यातील उद्योगांमध्ये बहुतांश कामगार हे बिगर गोमंतकीय आहेत. गोव्यातील लोकांना रोजगार देण्यासाठी उद्योगांनी धोरणे तयार करणे आवश्यक आहे. वेर्णा व साळगाव औद्योगिक वसाहतीशिवाय इतर अनेक उद्योग बंद आहेत. मायकल लोबो यांनी अनेक वर्षे उलटूनही लाटंमबार्से औद्योगिक वसाहत सुरू होत नाही, याकडे लक्ष वेधले.