‘बांधावरच्या देवा’च्या घुमटीला कारची धडक

वळपे-विर्नोडा येथे अपघात : घुमटीची मोडतोड, गाडीतील दोघे जखमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th July 2024, 08:50 pm
‘बांधावरच्या देवा’च्या घुमटीला कारची धडक

पेडणे : वळपे - विर्नोडा येथे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बांधावरच्या देवाच्या घुमटीला भरधाव वेगाने पेडण्याच्या दिशेने जात असलेली कार (जी.ए. ११ टी ४३६६) धडकल्याने देवाच्या घुमटीची नासधूस झाली. या कारमध्ये एक मुलगा व मुलगी असल्याची माहिती पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली. जखमी झाल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. 

देवाच्या घुमटीला बुधवारी भरधाव कारने धडक दिल्याने घुमटीची नासधूस केली. या भागातील नागरिकांनी अपघात झाल्यावर तत्काळ धाव घेतली.

हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून महामार्गाचे काम करताना कंत्राटदार तसेच कामगारांनी ही घुमटे हलवली नव्हती. त्या ठिकाणी नवीन घुमटी बाजूला बसवण्यासाठी आणून ठेवली होती. मात्र, गेली तीन वर्षे होऊनही ही घुमटी पाडण्यात आली नव्हती. याठिकाणी अनेक वेळा अपघात होऊनही कोणीही दगावले नसल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. अपघात झाल्यावर या गाडीचे एअर बॅग फुटल्याने गाडीतील दोघेजण जखमी झाले.

आम्ही वेळोवेळी सरकार, कंत्राटदार, स्थानिक आमदार यांच्याकडे या घुमटीबाबत मागणी केली. मात्र, वेळोवेळी मागणी करुनही याठिकाणी आजपर्यंत कोणी लक्ष दिले नाही. येथे फ्लायओव्हर केला असता तर कुठल्याही प्रकारची आडकाठी आली नसती. सरकारने या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी सुरेंद्र ठाकूर यांनी केली आहे.