२४ तासांत वाळपई अग्निशामक दलाला ४६ कॉल्स

अनेक घरांची पडझड : ४० ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून वाहतूक ठप्प

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th July 2024, 12:23 am
२४ तासांत वाळपई अग्निशामक दलाला ४६ कॉल्स

वाळपई : गेल्या २४ तासांमध्ये सत्तरी तालुक्यात ठिकठिकाणी झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा सुमारे दोन कोटीच्या आसपास आहे. गेल्या २४ तासांमध्ये वाळपई अग्निशामक दलाला ४६ कॉल्स आले. ४० ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी ठप्प झाला होता.

सोमवारी मध्यरात्री सत्तरी तालुक्याला चक्रीवादळाचा फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे पडून रस्ते बंद होण्याचा प्रकार घडला. वाळपई अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनगरवाडा केरी येथे रस्त्यावर झाड पडल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. केरी अंजुणे धरणानजीक झाड पडल्यामुळे महामार्गावर अडथळा निर्माण झाला.

म्हाऊस येथे रस्त्यावरील वीजवाहिन्यांवर झाड पडल्यामुळे वीजवाहिन्यांचे नुकसान झाले. वाळपई मामलेदार कार्यालयाच्या एका बाजूला झाड पडले. वेळूस या ठिकाणी फणसाचे झाड पडल्यामुळे वीजवाहिन्यांची हानी झाली.

नगरगाव वेळूस रस्त्यावर जंगली झाड पडल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याचा प्रकार घडला. भोमवाडा पाडेली येथील लहराई देवीच्या मंदिरावर काजूचे झाड पडले.

होंडा येथील सालेली बसस्थानकावर झाड पडल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. त्याचप्रमाणे भुईपाल होंडा या ठिकाणी सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या शेजारी झाड पडून अडथळा निर्माण झाला.

बसबांधणी प्रकल्प नजीक होंडा या ठिकाणी झाड पडले. वाळपई कदंब बसस्थानकाजवळ झाड पडल्यामुळे रस्त्यावर अडथळा निर्माण झाला. होंडा सत्तरी या ठिकाणी स्टेपिंग बार या ठिकाणी जंगली झाड पडून रस्ता वाहतूक खोळंबली. कोपर्डे सत्तरी येथील पशु पैदास केंद्राच्या ठिकाणी रस्त्यावर झाड पडले. त्याचप्रमाणे होंडा येथील जानकी बारनजीक फणसाचे झाड पडले.

होंडा येथील उदय गोवेकर यांच्या घरावर झाड पडून सुमारे १५ हजारांचे नुकसान होण्याचा प्रकार घडला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ भेट दिल्यामुळे सुमारे १ लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले.

वाळपई येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शेजारी असलेल्या कीर्ती बाणावलीकर यांच्या संरक्षक कुंपणावर झाड पडून सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले.

पोस्टवाडा होंडा येथील संतोष नाईक यांच्या घरावर झाड पडून दहा हजार रुपयांचे नुकसान झाले तर, पन्नास हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात आली. वेळूस येथील गणेश मोर्लेकर यांच्या घरावर झाड पडून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान तर, अग्निशामक दलाने ८० हजार रुपयांची मालमत्ता वाचविली.

होंडा सत्तरी येथील उमेश सुर्लकर यांच्या घरावर झाड पडल्यामुळे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाने जवळपास २० हजारांची मालमत्ता वाचविली.

ठाणे ग्रामीण आरोग्य केंद्राच्या छपराचे पत्रे उडाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वीजवाहिन्यांचे प्रचंड नुकसान

वाळपई वीज खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ठिकठिकाणी विजेचे खांब पडून वीजवाहिन्यांचे नुकसान झाले. यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा ठप्प झाला होता. सुमारे ५० लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे समजते.

वेळगे येथील महिला जखमी

वेळगे येथे घराच्या छपराचा पत्रा डोक्यावर पडून महिला गंभीर जखमी झाली. तिला वाळपई येथे सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल केल्यानंतर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सुधारक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सत्तरी तालुक्याला चक्रीवादळाचा फटका

सत्तरी तालुक्याला सोमवारी मध्यरात्री चक्रीवादळाचा फटका बसला. शेती बागायतीबरोबर अनेक घरांची छप्परे उडून गेली. याचा सर्वात जास्त फटका होंडा पंचायत क्षेत्रातील भुईपाल भागाला बसला आहे. या ठिकाणी अनेक घरांची पडझड झाली आहे.

अनेक भागातील रस्ते पाण्याखाली जाऊन रस्त्यावर झाडे पडल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी लक्षणीय कामगिरी करून अनेक भागांमध्ये ठप्प झालेले रस्ते रात्रीपर्यंत मोकळे केले.

होंडा पंचायत क्षेत्रात सोमवारी रात्री दोनच्या सुमारास जोरदार पाऊस व वाऱ्याच्या तडाख्याने बऱ्याच ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. भुईपाल कॉलनी येथील अस्मल मकंदर यांच्या घरावर मोठे झाड पडून घरासह आतील सामानाचे नुकसान झाले. होंडा पोस्तवाडा येथिल सर्फराज शेख यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर पुर्ण उडून गेले, तसेच चोडणकर नगर येथील उमेश सुर्लेकर यांच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले. परिसरातील वीजवाहिन्यांवर ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने वीज वाहिन्या तुटून वीज खात्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

हेही वाचा