बांबोळीत कॅसिनोवर छापा; ३३ लाखांचा ऐवज जप्त

गुन्हा शाखेची कारवाई : अटक केलेल्या ११ जणांची हमीवर सुटका

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
17th June, 09:31 am
बांबोळीत कॅसिनोवर छापा; ३३ लाखांचा ऐवज जप्त

पणजी : गुन्हा शाखेने बांबोळी येथील बिग डॅडीच्या ‘स्ट्राईक कॅसिनो’त सुरू असलेल्या बेकायदा पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून ११ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २८ लाख रुपये किमतीचे चिप्स आणि पत्ते व इतर जुगार साहित्य मिळून ३३ लाख रुपयांचे एेवज जप्त करण्यात आले.

गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार, बांबोळी येथील बिग डॅडीच्या स्ट्राईक कॅसिनोत बेकायदा पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि सूरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर रामानन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवार, १५ रोजी रात्री ११.५० ते १६ रोजी मध्यरात्री १.४५ या वेळेत वरील ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी दोन टेबलवर पत्त्याचा जुगार सुरू असल्याचे दिसून आले. पथकाने एक व्यवस्थापक, दोघे कर्मचारी आणि जुगार खेळणाऱ्या ८ जण, असे एकूण ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन टेबल, १४ टॅबलेट्स, पत्ते, २ लाइव्ह कार्ड शफलर्स, २ कार्ड स्कॅनर, २८ लाख रुपयांची चिप्स आणि इतर जुगार साहित्य मिळून एकूण ३३ लाख रुपये किमतीचे जुगार एेवज जप्त केला.

निरीक्षक किशोर रामानन यांनी ११ जणांविरोधात गोवा सार्वजनिक जुगार कायद्याचे कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. संशयितांची प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर सुटका केली.

अटक व नंतर सुटका झालेले संशयित

- रोहित बेलानी (३१, अंबरनाथ-महाराष्ट्र)
- पितांबर खाबलानी (३२, फरिदाबाद-हरयाणा)
- संजय भाटिया (५०, उल्हासनगर-महाराष्ट्र)
- मंजुनाथ सिद्धाबसप्पा (३९, बंगळुरू-कर्नाटक)
- एम. अनिल कुमार (४७, विजयवाडा-आंध्रप्रदेश)
- पंकज दुबे (३९, रायबरेली-उत्तर प्रदेश)
- जिलन के. (३८, होस्पेट-कर्नाटक)
- मनीष वागडे (३७, नागपूर-महाराष्ट्र)
-- कॅसिनोचे कर्मचारी
- प्रसाद घोगले (४३, सावंतवाडी-महाराष्ट्र)
- सुनील सिंग (२८, पाद्रीभाट-आगशी)
- केवीन डिसोझा (२६, कुठ्ठाळी)