वाळपईत गाय, वासरु चोरीचा प्रकार समाजमाध्यमावर व्हायरल

पिता - पुत्राला वाळपई पोलिसांकडून अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th June, 12:48 am
वाळपईत गाय, वासरु चोरीचा प्रकार समाजमाध्यमावर व्हायरल

वाळपई : शनिवारी रात्री एका मोटरसायकलवरुन दोघेजण गायीच्या वासराला घेऊन जात आहेत. त्याचा पाठलाग एक गाय करीत आहे. असा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. यामुळे एकच खळबळ निर्माण झाली होती. हत्या करण्यासाठी वासराला घेऊन जात आहे. अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत पोलिसांनी पिता पुत्राला अटक केली आहे.

याबाबतची माहिती अशी की, वाळपई सरकारी माध्यमिक विद्यालयाकडून मोटरसायकलवरुन दोघे जण एका वासराला घेऊन जात आहे. गाय त्याच्या मागून धावत आहे, असा अर्ध्या मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सत्तरी तालुक्यासह गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामुळे गायीची कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. शेवटी रात्री उशिरा पिता पुत्राला अटक करण्यात आली. ज्या वासराची व गायीची चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, ती गाय व वासरू त्यांच्या मालकीचे नव्हते हे स्पष्ट झाले. यामुळे वासरु चोरुन नेण्याचा घटनेवरून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती वाळपई पोलिसांकडून मिळाली आहे.

गोरक्षा अभियानाचे प्रमुख हनुमंत परब यांनी या घटनेबाबत खेद व्यक्त केला. गोरक्षा संघटना गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला होता. यामुळे पोलिसांवर दबाव आला व शेवटी त्यांना अटक करावी लागली.

पोलिसांकडून लपवाछपवी

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांनी पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सदर गाय व वासरू त्यांच्याच मालकीचे असल्याचे स्पष्ट केले. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. मात्र, रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. यामुळे या प्रकरणात संशय व्यक्त करण्यात येत आहे.