टीम इंडियासह ६ संघांची सुपर-८ मध्ये धडक

पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंकेसह १० संघ स्पर्धेतून ‘आऊट’

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
16th June, 12:39 am
टीम इंडियासह ६ संघांची सुपर-८ मध्ये धडक

दुबई : टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये ग्रुप सामने संपत आले असून आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती सुपर-८ची. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने ग्रुपमध्ये सलग तीन सामने जिंकत दिमाखात सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय सहा संघांनी धडक मारली. तर पाकिस्तान, श्रीलंकेसह दहा संघांवर ग्रुपमध्येच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली आहे. सुपर-८ चे वेळापत्रकही जवळपास निश्चित झाले आहे. उरलेले दोन संघ कोणते याचा निकाल अद्याप लागायचा आहे.

टीम इंडियाचे सुपर-८ वेळापत्रक

सुपर-८ मध्ये टीम इंडियाला तीन सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना २० जूनला अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर २२ जूनला ग्रुप डीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाबरोबर सामना खेळवला जाईल. तर २४ जूनला टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. 

सहा संघांनी केले क्वालीफाई

टी-२० वर्ल्ड कपच्या सुपर-८ मध्ये भारतासहित सहा संघांनी प्रवेश केला आहे. ग्रुप ए मधून भारत आणि अमेरिका, ग्रुप बी मधून ऑस्ट्रेलिया, ग्रुप सी मधून अफगाणिस्तान आणि वेस्टइंडिज तर ग्रुप डी मधून दक्षिण आफ्रिकेने सुपर-८ मध्ये धडक मारली आहे. ग्रुप बी आणि ग्रुप डीमधले दोन संघ अद्याप ठरायचे आहेत. 

दिग्गज संघ बाहेर

यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य संघांना ग्रुप सामन्यात मोठा धक्का बसला आहे. यात पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. यााशिवाय कॅनडा, आयर्लंड, नामिबिया, ओमान, पीएनजी, युगांडा, नेपाळ संघांचा समावेश आहे. बलाढ्य पाकिस्तानला तीनपैकी एकच सामना जिंकता आला. तर ग्रुप सीमध्ये न्यूझीलंडलाही तीन पैकी एक सामना जिंकता आाला. ग्रुप डीमध्ये श्रीलंका संघाला तर तीनपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही.

१९ जूनपासून सुपर-८ चे सामने

सुपर-८ सामन्यांना १९ जूनपासून सुरुवात होणार आहे. यात पहिला सामना अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान होणार आहे. तर सुपर-८ चा शेवटचा सामना अफगाणिस्तान आणि ग्रुप-डी मधल्या दुसऱ्या स्थानावरील संघांदरम्यान होणार आहे. यानंतर सेमीफायनलचा पहिला सामना २६ जूनला, तर सेमीफायनलचा दुसरा सामना २७ जूनला खेळवला जाईल. २९ जूनला टी-२० वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगेल. हा सामना वेस्टइंडिजच्या बारबाडोसमध्ये होईल.


दहाव्या टी-२० विश्वचषकासाठी अमेरिकेला एंट्री

यूएसएला नवव्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सुपर ८ मध्ये एन्ट्री घेताच सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी मिळाली आहे. अमेरिकेने २०२६ साली (दहाव्या) होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळवला आहे. या टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत सुपर ८ मध्ये पोहचणाऱ्या संघांना आगामी २०२६ च्या आयसीसी स्पर्धेसाठी प्रवेश मिळाला आहे. आगामी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतही एकूण २० संघ खेळणार आहेत. त्यातील २० पैकी ८ संघांना (यजमान भारतासह) थेट प्रवेश मिळाला आहे. तर त्यानंतर सर्वोत्तम रँकिंग असलेल्या ३ संघांसह यजमान श्रीलंकेचा समावेश होणार आहे.  आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवणाऱ्या संघांमध्ये (१४ जूनपर्यंत) ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, टीम इंडिया, विंडिज, दक्षिण आफ्रिका आणि यूएसए या ६ संघांचा समावेश झाला आहे. तर आता इंग्लंड आणि बांगलादेशही सुपर ८ मध्ये पोहचताच आपली जागा निश्चित करतील. तसेच इंग्लंड आणि बांगलादेशची संधी हुकली तर नेदरलँड्स आणि स्कॉटलँडला थेट संधी मिळेल. अशाप्रकारे ८ संघ निश्चित होतील.


भारताचा उपांत्यफेरीचा मार्ग झाला सोपा

फ्लोरिडा : आयसीसी टी २० वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाद झाला. ए ग्रुपमधील अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे आयर्लंड आणि अमेरिका या दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळाला आहे. अमेरिकेने सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवल्यामुळे पाकिस्तान संघ बाहेर झाला. यामुळे भारताचा उपांत्यफेरीचा मार्ग सोपा झाला आहे.       

उपांत्य फेरीत भारताची लढत अशा दोन संघासोबत होऊ शकते, ज्याच्या विरुद्ध भारत कधीच पराभूत झाला नाही. भारताचा उपांत्यफेरीत अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा ऑस्ट्रेलियाशी सामना होऊ शकतो. त्यापैकी अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघाविरुद्ध टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत कधीच पराभूत झाला नाही.      

ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा संघ  सुपर ८ साठी पात्र ठरले आहेत. तिसरी टीम बांगलादेश किंवा नेंदरलँड यापैकी एक असणार आहे. यामुळे २० जून अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा सामना होईल. २२ रोजी बांगलादेश विरुद्ध, तर २४ जूनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे. तसेच बांगलादेशऐवजी नेदरलँडचा संघ आला तरी समीकरण असेच राहणार आहे. यामुळे उपांत्यफेरीत पोहचण्याचा भारताचा मार्ग सोपा होणार आहे.