लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; पुराव्याअभावी युवकाची मुक्तता

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
05th June, 11:26 pm
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; पुराव्याअभावी युवकाची मुक्तता

पणजी : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणातील वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला आहे. याशिवाय तक्रार दाखल करण्यास उशीर का झाला, याबाबत माहिती सादर केली नाही. तसेच महत्त्वाचे पुरावे न्यायालयात सादर करण्यास अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवून पणजी येथील जलदगती व पोक्सो न्यायालयाने संशयित युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा निवाडा न्या. दुर्गा मडकईकर यांनी जारी केला आहे.

या प्रकरणी फोंडा पोलिसांनी ११ फेब्रुवारी २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, पीडित युवतीने तक्रार दाखल केली होती. संशयित युवक आणि पीडित युवती ओळखीचे होते. त्यामुळे मुलगी त्याच्याबरोबर कामाला जात होती. दरम्यान संशयित युवकाने २५ जानेवारी २०१२ ते १ नोव्हेंबर २०१६ दरम्यान तिच्याकडे मैत्री केली. याच दरम्यान संशयिताने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले होते. त्यानंतर संशयित युवकाच्या कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्याचे सांगितले. तसेच तिच्याशी लग्न केल्यास त्याचा अपघाती मृत्यू होणार किंवा त्यांना मूलबाळ होणार नसल्याचे कारण समोर करून लग्न करण्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी संशयितांविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी भादंसंच्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर न्यायालयाने संशयित युवकाला ५ मे २०१८ रोजी सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून १२ मे २०१८ रोजी न्यायालयात युवकाविरोधात आरोपपत्र दाखल केले.

या प्रकरणी न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन २४ एप्रिल २०१९ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, न्यायालयात सादर केलेला वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला होता. तसेच संशयित युवकाविरोधात वैद्यकीय पुरावे सादर करण्यात अपयश आले. तसेच सर्व पंच साक्षीदार पीडित मुलीच्या ओळखीचे असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयिताची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. 

हेही वाचा