गोव्यात चोरांचा सुळसुळाट... तरी सुद्धा ‘भिवपाची गरज ना’!

गोव्यातील विविध मंदिरांत व घरात चोरीच्या घटना वाढत आहेत. मागील ५ महिन्यांत तब्बल ८ मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. गोव्यात अपघात सत्र व चोऱ्या हल्ली वाढतच आहेत. चोरीची प्रकरणे आजकाल रात्रीच होत नाहीत तर दिवसा सुद्धा होतात.

Story: चष्म्यातून |
02nd June, 07:32 am
गोव्यात चोरांचा सुळसुळाट... तरी सुद्धा ‘भिवपाची गरज ना’!

चोरटे मंदिरांसोबतच बंद घरे, फ्लॅटला निशाणा बनवतात. तसेच ज्या घरात वृद्ध राहतात व त्यांच्यासोबत आणखी कुणी नसतो अशा घरांना ते आपले लक्ष्य करतात. म्हणजे एकंदरीत बघितलं तर चोर पोलिसांच्या दोन पावले पुढे आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मागच्या वर्षी तर एका चोरट्याला बांबोळीत नेले असता त्याने तिथून पळ काढला होता. फिटनेसमध्ये तो पोलिसांपेक्षा पुढे होता म्हणून पळून जाण्यात त्याला यश आले असे म्हणावे लागेल. 

चोरीच्या विविध पद्धती आहेत व चोरटे या सर्व पद्धतींचा वापर करतात. रस्त्यावरून जाताना मंगळसूत्र किंवा गळ्यातील हार पळवून नेणे ही सर्वात जुनी व सररास वापरली जाणारी पद्धत म्हणता येईल. नंतर धूम स्टाईल चोऱ्या वाढल्या. मोबाईलवर बोलताना किंवा सेल्फी काढताना हातातील मोबाईल पळवणाऱ्या घटनाही झालेल्या आहेत. प्रथम एकटा चोरतो व नंतर त्यांची साखळी असते व त्याप्रमाणे ते चोरलेली वस्तु पास करतात. अशा वेळी आपल्या किमती वस्तु आपल्यासोबत ठेवताना विशेष काळजी घ्यायला हवी. तसे आजकाल सामान्य माणसांपेक्षा महागडे मोबाईल चोरांपाशी असतात (चोरलेलेच). शक्यतो पूर्वीप्रमाणे एक बेल्ट मोबाईलला लावलेला बरा म्हणजे हिसकावला तरी थोडा वेळ तरी मिळेल वाचवायला. गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घ्यायला हवी. ‘रिस्पॅक्ट ऑल, सस्पॅक्ट ऑल’ हा मंत्र लक्षात ठेवावा. जसे म्हणतात की, लावारिस बॅगेमध्ये बॉम्ब असू शकतो तसा समोरचा माणूस चोर असू शकतो हे लक्षात ठेवा. आणखी एक जुनी पद्धत व ज्याला लोक आज सुद्धा बळी पडत आहेत ते म्हणजे गुंगीचे औषध घालून खायला देणे. बस, ट्रेन किंवा कुठेही प्रवास करताना अनोळख्या माणसाने कितीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केला व काही खायला दिले तर त्याला नकार द्यावा किंवा घेऊन नंतर खातो असे म्हणावे. 

कौलारू घरात चोरी करायला सर्वात सोपे. कौले काढून आरामात चोरांचा घरप्रवेश करता येतो. पण आता चोरीचे प्रमाण शहरात जास्त वाढलेले आहे. गावात चाहूल असते. एकमेकांच्या आधाराला लोक असतात. शहरात शेजारी कोण राहतो तेच माहीत नसते. संपर्क कमी असतात. तसेच बंद फ्लॅटमध्ये चोरीचे प्रमाण वाढत आहे. दरवेळी सरकारला किंवा पोलिसांना दोष देता येणार नाही हे ही लक्षात घ्या. पण असे वाटते जणू सरकारचे काहीच नियंत्रण नाही व पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात नाहीत म्हणून चोरटे जणू ‘भिवपाची गरज ना’ हा कानमंत्र घेऊन चोरी करत सुटले आहेत. पोलीस यंत्रणासुद्धा कडक हवी. तपासात काय कमी पडते हेही बघावे. शिक्षा कठोर हवी. वरून जर नियंत्रण चांगले असेल तर चोरीचा किंवा खुनाचा छडा लवकर लागू शकतो. मंदिरात चोरटे एकदम मालामाल होतात म्हणून ते आधी फंडपेटी फोडण्यावर लक्ष देतात. गावातील मंदिरे, निर्जन स्थळी असणारे किंवा विशेषतः टेकडीवर असणारे हनुमान मंदिर फोडण्यात चोरट्यांचा विशेष रस दिसून येतो. गावात कित्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले आहेत. खूप सीसीटीव्ही चालत नाहीत किंवा चोरटे आधी सीसीटीव्ही फोडून टाकतात. त्यासाठी ते तोंड बंद करून येतात व बाईकची नंबरप्लेट सुद्धा लपवून येतात. यामुळे चोरी करण्यात त्यांना यश येते. रात्री रस्त्यांवरील पथदीप चालणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण अंधाराचा फायदा करून घेण्यात चोर हुशार असतात. काही चोरटे सामान्य माणसांप्रमाणेच चोरी करण्यासाठी येतात म्हणजे त्यांना पाहून जरा सुद्धा वाटत नाही की हे चोरी करायला आलेले असणार. मंदिरात फंडपेटी चोरण्याचा प्रकार समजला जाऊ शकतो पण त्यासोबत मूर्तीची विटंबना कशाला करतात हे मात्र त्यांनाच ठाऊक. 

चोरी करताना आधी चोर सर्व अभ्यास करतात. आधी तुमच्या घरी सेल्समन बनून येणे किंवा भाडेकरू म्हणून येणे, घराला किती कुठे कशा प्रकारची सुरक्षा किंवा खिडक्या आहेत हे बघणे इत्यादी सर्व अभ्यास ते व्यवस्थित करतात. घरातील सर्व खिडक्या व दारे बंद आहेत याची काळजी घ्यावी कारण खूप वेळा चोर खुल्या खिडकीतून प्रवेश करतात. त्यांच्याजवळ सर्व प्रकारची औजारे असतात. गॅस व्हेल्डिंग, मोठे स्क्रूड्राईव्हर, पक्कड, मास्टर-की इत्यादी. तुमच्या घराबाहेर सोपेपणी आतमध्ये शिरायला मिळणार अशी कुठलीही वस्तू जर आढळली तर त्यांना विशेष मेहनत घ्यायला लागत नाही. 

आता मुख्य प्रश्न, चोरट्यांपासून स्वतःला कसे वाचवावे? यावर काही उपाय बघू. परगावी जात असताना शेजाऱ्यांना सांगून जावे. घर किंवा फ्लॅट पूर्णपणे बंद राहणार तर दाराबाहेरील छोटा दिवा चालू ठेवावा. घरात मुख्य ठिकाणांवर सीसीटीव्ही लावावेत व त्याची फूटेज मोबाईलवर मिळणार याची पण खात्री करावी. खिडक्यांजवळ किमती वस्तू, दागिने किंवा मोबाईल ठेवू नये. खूप लोकांना नॅटवर्क मिळत नाही म्हणून मोबाईल खिडकीवर ठेवण्याची सवय असते पण त्यामुळे चोराच्या हाताला नॅटवर्क मिळेल हे लक्षात ठेवा. चोर शक्यतो लहान पण किमती वस्तू चोरतात ज्या बॅगेत आरामात मावतात. अशा वस्तू लपवून ठेवाव्यात. शिडी वगैरे घराला लावून ठेवू नका. शक्यतो लपवून ठेवा. परगावी जाताना किंवा गेल्यावर जर घरी कुणीच नाही तर कधीच सोशल मिडियावर लाईव्ह अपडेट टाकू नका. यामुळे चोरट्यांना घर बंद असल्याचा घरबसल्या संदेश मिळतो. घरकाम करायला जर कुणी येत असेल तर त्याची सर्व माहिती आपल्याजवळ असायला हवी, त्याचे ओळखपत्र, मोबाईल क्रमांक, फोटो हे सर्व असायला पाहिजे. घरात जरी कुत्रा नसला तरी ‘कुत्र्यापासून सावध’ हा बोर्ड लावून ठेवावा म्हणजे एक भीतीचे वातावरण निर्माण होईल. बॅगेत किंवा घरात असताना सुद्धा मिर्ची पावडर किंवा त्याचे पाणी तयारच ठेवावे. काही चोरटे गुंडांप्रमाणे असतात. ते फक्त धमकी द्यायला आलेले असतात. तुमच्या परिवारमधील कुणाला मारून टाकणार म्हणून धमकी देणारे भ्याड गुंड-चोर राज्यात खूप आहेत. काही जणांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याने पण अशी कृत्ये करतात. नाहीतर उगाच कुणी माणूस कुणाच्या घरी जाऊन असा धमकी देत नाही किंवा चोरी करण्याची हिम्मत सुद्धा करत नाही. गुंड व चोरट्यांनी हे पण लक्षात ठेवावे की समोरचा माणूस काही मुर्ख नाही. तुमच्यापेक्षा तो खूप पुढे आहे. कितीही गुंडागिरी व चोरी केली तरी काही निशाणी तुम्ही मागे सोडून जाल हे लक्षात ठेवा. तसेच कर्माचा सिद्धांतसुद्धा लक्षात ठेवावा. तुम्ही केलेल्या कर्मांची फळे याच जन्मात भोगावी लागणार.


आदित्य सिनाय भांगी, सहायक प्राध्यापक (हिंदी), गोवा विद्यापीठ