वजरा फॉल्स पर्यटकांमुळे बनतोय कचराकुंड!

गोवावासीयांसाठी आकर्षण स्थळ : बेजबाबदार पर्यटकांमुळे परिसर बनला अस्वच्छतेचे आगार

Story: बम्मू फोंडे |
24th May, 11:46 pm
वजरा फॉल्स पर्यटकांमुळे बनतोय कचराकुंड!

जोयडा : तालुक्याला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे. येथील डोंगर -घाटात अनेक लहान-मोठे धबधबे आहेत. त्यातलाच एक उन्हाळ्यात वाहणारा धबधबा म्हणून इळये दाबे येथील वजरा फॉल्सची ओळख आहे. गोवा आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचे हे आकर्षणाचे स्थळ आहे. पण, अलीकडे पर्यटकांकडून केल्या जाणाऱ्या अस्वच्छतेमुळे हे निसर्गरम्य स्थळ ‘कचराकुंड’ बनू लागले आहे.


जोयडा तालुक्यातील असू ग्रामपंचायत क्षेत्रात इळये दाबे येथे पांढरी नदीत हा धबधबा आहे. पांढरी नदीचे पाणी हळूहळू कमी झाले की काळ्या दगडावरून कोसळणारा हा धबधबा दिसून येतो. तो पाहण्यासाठी व आंघोळीसाठी येथे आठवड्याच्या शेवटी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र, येथे साधन सुविधांची कमतरता आहे. सुरक्षारक्षक नसल्याने कोणीही येतो, काहीही करतो आणि जातो, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

धबधबा पाहण्यासाठी येणारे युवकांचे गट, कुटुंबीय धबधब्याशेजारी जंगलात अन्न शिजवून खातात, पार्ट्या करतात. त्यातून निर्माण झालेला प्लास्टिक कचरा, दारूच्या बाटल्या, शिल्लक उरलेले अन्न उघड्यावर टाकतात. त्यामुळे या परिसराला भकास रूप प्राप्त झाले आहे.

धबधब्यापर्यंत जाण्यासाठी काँक्रेटचा रस्ता करण्यात आला आहे. पण कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या नाहीत. नियमांचे फलक नाहीत. त्यामुळे येथे येणारे पर्यटक बेशिस्तपणे वागतात. धबधब्याचे पाणी पडते त्या ठिकाणी मोठी पाण्याची कोंड आहे. त्यात अनेक पर्यटकांनी बुडून जीव गमावला आहे. असे असतानाही पर्यटकांच्या सुरक्षेविषयी कोणतीच पावले येथे उचलली गेली नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात पर्यटकांना गारवा देणारा हा वजरा फॉल्स गैरप्रकारचे, अस्वछतेचे आगार बनला आहे.

गैरप्रकारांना आळा घालण्याची गरज

पर्यटक प्लास्टिक व कागदाच्या पिशव्या, केरकचरा, दारुच्या रिकाम्या बाटल्या धबधब्यात फेकतात. याची गांभीर्याने दखल घेऊन सदर गैरप्रकारांना तत्काळ आळा घालण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी असू ग्रामपंचायत, वन विभागाने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहेत. पर्यटकांनीही याबाबत सज्ञान होण्याची गरज निर्माण झाली आहे.