तेलगु अभिनेत्री हेमाने रेव्ह पार्टीत घेतले होते ड्रग्ज! बंगळुरू पोलिसांकडून स्पष्ट

अन्य एका अभिनेत्रीसह ८६ जणांच्या वैद्यकीय चाचणीतून ड्रग्ज घेतल्याचे झाले स्पष्ट

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th May, 03:11 pm
तेलगु अभिनेत्री हेमाने रेव्ह पार्टीत घेतले होते ड्रग्ज! बंगळुरू पोलिसांकडून स्पष्ट

बंगळुरू : येथे चार दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या हायप्रोफाईल रेव्ह पार्टी प्रकरणात सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री हेमा हिने ड्रग्जचे सेवन केल्याचे प्रयोगशाळेच्या चाचणीतून स्पष्ट झाले आहे. इतकेच नाही तर अन्य एक अभिनेत्रीनेही ८६ जणांनी ड्रग्ज घेतल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. यासंदर्भात पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकच जारी केले आहे.

गेल्या सोमवारी फार्म हाऊसवर छापा टाकल्यानंतर हायप्रोफाइल लोकांसोबत काही सेलिब्रिटी रेव्ह पार्टीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर तेलगू सिनेसृष्टीतील अभिनेत्री हेमा हिने व्हीडिओ जारी करत पार्टीत नसल्याचा दावा केला होते. मात्र, आता बंगळुरू पोलिसांनी हेमाच्या रक्तात ड्रग्ज आढळले असल्याचे सांगितले.

बंगळुरू पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकात छाप्याचा घटनाक्रम जाहीर केला आहे. ही घटना १९ आणि २० मे रोजी घडली. एका वाढदिवसाच्या निमित्ताने मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होता. मात्र, पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हेमाकडे तिची विमानाची तिकिटे असून ती बंगळुरूला गेल्याचा पुरावा असल्याचे पोलिसांनी म्हटले.

वाढदिवसाच्या आडून रेव्ह पार्टी

वासू नावाच्या एका व्यक्तीची बर्थडे पार्टी आयोजित करण्यात आली होती. या बर्थ डे पार्टीत शंभरहून अधिक जण उपस्थित होते. या प्रकरणी १९ मे रोजी तक्रार दाखल झाली आहे. त्यात शांततेचा भंग करणे, कोकेन, हायड्रो-गंगा आणि एमडीएमए यांसारख्या ड्रग्जचे सेवन करणे, त्याची बेकायदेशीर विक्री करणे अशा घटना या पार्टीत सुरू होत्या, असे पोलिसांनी म्हटले आहे.

केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) इलेक्ट्रॉनिक सिटी आणि हेब्बागोडी पोलीस स्थानकामधून तपास हाती घेतला आहे. ड्रग्ज चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांना नोटीस बजावण्याचे आणि चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. 

हेही वाचा