सभापतींच्या पुढाकाराने मळकर्णेत साकारणार श्रमदानातून घर

फोंडू गावकर यांच्या घराचे काम सुरू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd May, 11:56 pm
सभापतींच्या पुढाकाराने मळकर्णेत साकारणार श्रमदानातून घर

सांगे : सभापती रमेश तवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्रमधाम’ योजनेतून गरजवंतांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे. सभापती रमेश तवडकर यांनी चांगली योजना मार्गी लावली असून यातून अनेक गरीब लोकांना घर मिळणार आहे. सांगे मतदारसंघातील मळकर्णे येथील फोंडू गावकर यांच्या घराचे काम सुरू केले असून दुसरे काम लवकरच नेत्रावळी येथे सुरू होणार असल्याचे सांगून सांगेचे आमदार तथा समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सभापती रमेश तवडकर यांचे आभार मानले.

फोंडू गांवकर यांचे मातीचे जुने घर गेल्या पावसाळ्यात अर्धे कोसळले होते. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते बांधणे शक्य नव्हते. सरपंच राजेश गावकर यांनी त्यांचे घर श्रमधाम योजनेतून बांधून देण्याची विनंती सभापती रमेश तवडकर यांना केली. तवडकर यांनी होकार दिल्यावर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. यावेळी सभापती रमेश तवडकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, सरपंच राजेश गांवकर, बुंदो वरक, सविता तवडकर, समाजसेवक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या पदाचा मोठेपणा न दाखवता रेतीच्या टोपल्या, चिरे व सिमेंट डोक्यावर घेऊन काम करणारे सरपंच, उपसरपंच तसेच इतर कार्यकर्त्यांचेही मंत्री फळदेसाई यांनी आभार मानले.

श्रमधाम योजनेतून गावकर यांचे घराचे स्वप्न साकार झाल्याने सरपंच राजेश गांवकर यांनी सभापती तवडकर यांचे आभार मानले.

संपूर्ण गोव्यात श्रमदानातून घरे उभारणार

ही घरे कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून बांधली जातात. काणकोण मतदारसंघात हा प्रयोग सुरू केला. आता संपूर्ण गोव्यात ही कामे केली जाणार आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट आणि राहण्यासाठी घर नाही, अशांसाठी घरे बांधून दिली जातील. लोकांचे आर्थिक सहाय्य मिळत असल्याने अनेकांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.