धीरोदात्त मयूरी साळकर

जीवनात कोणताही कठीण प्रसंग आला तरी 'ती' न डगमगता आलेल्या कठीण प्रसंगाला धीराने तोंड देत त्या प्रसंगाशी सामना करते. या अशा कठीण प्रसंगात तिच्यातील सामर्थ्याची तिला आणि समाजाला जाणीव होत रहाते. अशीच एक कणखर अस्तुरी, मडगावची मयूरी साळकर.

Story: तू चाल पुढं |
18th May, 06:20 am
धीरोदात्त मयूरी साळकर

माहेरी लाडात वाढलेल्या मयूरीने आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्नाची गाठ बांधली. लग्नाची सुरवातीची वर्षे सुखात गेल्यावर तिच्या संसारात एका छकुलीने जन्म घेतला. तिच्या कोडकौतुकात मग्न असतानाच मयूरीला आपण दुसर्‍यांदा आई होणार असल्याची चाहूल लागली. तिच्या या सुखात अचानक मिठाचा खडा पडला. पोटात दुसरा गर्भ वाढत असतानाच तिच्या पतीने दुसरे लग्न करून तिच्याशी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर अवघ्या पाच वर्षात तिच्या पतीने दुसरे लग्न करून तिला वाऱ्यावर सोडून दिले.

गरोदर असलेल्या मयूरीच्या मनावर झालेला हा आघात फार मोठा होता. पदरात एक लहान मुलगी, पोटात वाढणारा तिच्या पतीचा गर्भ आणि तिच्या पतीचे दुसरे लग्न, हे सगळेच तिला प्रचंड मानसिक धक्का देणारे होते. त्यातच लगेच कोविड आला आणि टाळेबंदी झाली. अशा अनपेक्षित आणि मन बधिर करणार्‍या या घटना मयूरीच्या जीवनात अचानक घडल्या आणि तिला काही विचार करण्याची संधीही मिळाली नाही. तरीही न डगमगता तिने आलेल्या कठीण प्रसंगाला धीराने तोंड दिले. पुढे तिला मुलगा झाला आणि तिच्या समोर आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन एकटीनेच करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. कोविडच्या संघर्षमय वातावरणात या प्रसंगाला तोंड द्यायला मयूरीने कंबर कसली. तिने धीर सोडला नाही. अशावेळी तिला साथ द्यायला तिचे वडील पुढे आले. तिच्या वडलांचे गांधी मार्केटमध्ये एक लहानसे दुकान होते. त्याची चावी तिने मयूरीकडे सोपवली. “हे दुकान आता तू चालवायचे. तुझ्यावर ही जबाबदारी आहे.” असे वडलांचे धीराचे शब्द ऐकताच मयूरीच्या मनाला उभारी आली आणि तिने दुकानाचा ताबा घेऊन दिवसरात्र मेहनत करायला सुरवात केली.

तिच्या या दुकानात महिलांची वस्त्रे, प्रावरणे, विविध अलंकार, तसेच इतर गरजेच्या वस्तू उपलब्ध आहेत. गांधी मार्केट हा नेहमीच गजबजलेला परिसर. त्यामुळे तिच्या दुकानावर गर्दी ही नेहमीच असते. सकाळी दुकानात आल्यावर संध्याकाळी उशिरापर्यंत त्या दुकानात राहून ग्राहकांना हवे नको ते मयुरी जातीने बघत असते. हे सर्व सांभाळताना तिने आपल्या मुलांकडे दुर्लक्ष केले नाही. तिची दोन्ही मुले आज चांगली शिकत आहेत.

पतीने विश्वासघात करून बायको आणि मुलांना वार्‍यावर सोडून दुसरे लग्न केले, हा आघात मयूरीने मोठ्या हिंमतीने पचवला. पतीने केलेल्या विश्वासघाताचे दु:ख मयूरीच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवते. तरीही ती हसतमुखाने दुकानात आलेल्या ग्राहकांच्या सेवेसाठी तयार असते. अचानक समोर उभ्या ठाकलेल्या दु:खावर मात कशी करायची हे या धीरोदात्त मयूरीकडे पाहून समजते.


कविता प्रणीत आमोणकर