रांचीमध्ये बर्ड फ्लूची साथ... कोंबडी खरेदी-विक्रीवर बंदी! आरोग्य पथक तैनात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 02:49 pm
रांचीमध्ये बर्ड फ्लूची साथ... कोंबडी खरेदी-विक्रीवर बंदी! आरोग्य पथक तैनात

रांची : बर्ड फ्लूसारख्या धोकादायक आजाराने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. अमेरिकेत एव्हीयन फ्लूची प्रकरणे समोर आल्यानंतर आता भारतातही या विषाणूचा प्रवेश झाला आहे. झारखंडच्या रांचीमध्ये बर्ड फ्लूची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. बर्ड फ्लू हा एक विषाणू आहे जो पक्ष्यांकडून मानवांमध्ये सहज पसरू शकतो. म्हणूनच बर्ड फ्लूचा फैलाव झालेल्या भागातील लोकांनी अंडी आणि चिकन याचे सेवन करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

झारखंडची राजधानी रांची येथील सरकारी पोल्ट्री फार्ममध्येच ‘बर्ड फ्लू’ची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तत्काळ प्रभावाने कोंबड्यांच्या विक्री व खरेदीवर बंदी घातली आहे.त्याच वेळी, H5N1 एव्हियन बर्ड फ्लू रोखण्यासाठी जलद गतीने काम करणारे आरोग्य पथक तयार करण्यात आले आहे. या पथकावर बर्ड फ्लू रोखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रांचीमध्ये बर्ड फ्लूचा (एव्हियन फ्लू) उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत २,१९६ पक्षी मारले गेले आहेत. रांचीच्या पशुसंवर्धन विभागाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

एव्हियन बर्ड फ्लूवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) ची स्थापना करण्यात आली आहे. आरआरटीने कुक्कुटपालन केंद्रांमधील जबाबदार अधिकाऱ्यांना स्वच्छता राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय एव्हियन फ्लू नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. जेणेकरून H5N1 बर्ड फ्लू थांबवणे शक्य होईल. रांची येथील होटवा पोल्ट्रीमध्येही H5N1 एव्हीयन इन्फ्लूएंझाचे प्रकरण नोंदवले गेले.

तूर्त चिकन न खाण्याची सूचना

एका पोल्ट्री फार्मचे एजीएम डॉ. गणेश राम यांनी नागरिकांसाठी सूचना जारी केली आहे. पोल्ट्री फार्मपासून एक किलोमीटरच्या परिघातील घरांमध्ये सर्व अंडी आणि कोंबडी काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बर्ड फ्लूबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. लोकांना सध्या चिकन वापरू नका, असे सांगितले जात आहे. १,७०० अंडी नष्ट करण्यात आली असून या रोगामूळ १,८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पोल्ट्री फार्मचे निर्जंतुकीकरण सुरू

पोल्ट्री फार्मचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. आता पुढील तीन महिने एकही पक्षी आणला जाणार नाही. बर्ड फ्लूने बाधित पक्ष्यांचे नमुने गोळा केल्यानंतर ते कोलकाता येथे तपासणीसाठी पाठवले जात आहेत. २० एप्रिल रोजी झारखंड आणि केंद्र सरकारने अधिकृतपणे बर्ड फ्लूची पुष्टी केली होती.

हेही वाचा