जाहीर प्रचार आज संपणार; मतदान फक्त दोन दिवसांवर

भाजप, आरजीपी प्रचारात सुस्साट; काँग्रेस अखेरपर्यंत थंडच


05th May, 12:33 am
जाहीर प्रचार आज संपणार; मतदान फक्त दोन दिवसांवर

भाजपने शनिवारी मडगावात आयोजित केलेल्या रोड शोमध्ये सहभागी उमेदवार पल्लवी धेंपो, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार दिगंबर कामत यांच्यासह नेते व कार्यकर्ते. (संतोष मिरजकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : लोकसभा निवडणुकीतील गोव्यासाठीचे मतदान येत्या मंगळवारी होणार आहे. मतदानास अवघे दोन दिवस शिल्लक असून, रविवारी जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्षांनी अखेरच्या दोन दिवसांत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
अनेक वर्षांनंतर गोव्यात यावेळची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. प्रमुख विरोधी काँग्रेस यांच्यासह रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजीपी) या तीन पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. सत्ताधारी भाजपने उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपो, काँग्रेसने उत्तर गोव्यातून अॅड. रमाकांत खलप आणि दक्षिण गोव्यातून कॅप्टन विरियातो फर्नांडिस, आरजीपीने उत्तर गोव्यातून मनोज परब आणि दक्षिण गोव्यातून रुबर्ट परेरा यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय उत्तर गोव्यातून मीलन वायंगणकर, सखाराम नाईक, थॉमस फर्नांडिस, विशाल नाईक, शकील शेख, तर दक्षिण गोव्यातून डॉ. श्वेता गावकर, दीपकुमार मापारी, हरिश्चंद्र नाईक, अॅलेक्सी फर्नांडिस आणि डॉ. कालिदास वायंगणकर हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी ईव्हीएममध्ये बंद होणार असून, त्याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे.
यावेळी भाजपने देशात ‘चारशे पार’चा नारा दिला होता. त्यामुळे गोव्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपच्या स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू केले होते. त्यादृष्टीने बांधणी करत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभांचे राज्यात आयोजन केले. शनिवारी मडगावात रोड शो आयोजित करण्यात आला होता. यात मुख्यमंत्र्यांसह नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याला मतदारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय भाजपच्या देशपातळीवरील अनेक नेत्यांनीही गोव्यात येऊन सभा, बैठकांना संबोधित करत केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर आणण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, यावेळची लोकसभा निवडणूक पहिल्यांदाच लढत असलेल्या आरजीपीनेही दोन्ही मतदारसंघांतील गावागावांत जाऊन प्रचार करण्यावर भर दिला. परंतु, काँग्रेस आणि इंडी आघाडीतील इतर पक्ष मात्र प्रचारात कमी पडल्याचे चित्र शेवटपर्यंत दिसून आले. त्याबद्दल काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून कमालीची निराशा व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेस नेत्यांची अखेरपर्यंत गोव्याकडे पाठच !
काँग्रेसने गोव्यातील जाहीर प्रचारासाठी ज्या स्टार प्रचारकांची यादी दिली होती, त्यातील केवळ शशी थरूर आणि पवन खेरा हे केंद्रीय पातळीवरील केवळ दोन नेते गोव्यात दाखल झाले. थरूर यांनी दक्षिण गोव्यात सभा, तर खेरा यांनी पणजीत पत्रकार परिषद घेतली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंसह राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह इंडी आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी गोव्यात येऊन प्रचार केला असता तर त्याचा फायदा इंडी आघाडीला निश्चितच मिळाला असता. परंतु, या नेत्यांनी शेवटपर्यंत गोव्याकडे पाठच केल्याचा परिणाम काँग्रेस उमेदवारांच्या मतांवर होऊ शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.        

हेही वाचा