गोव्यात मुख्यमंत्रिपद भूषवलेले फक्त तिघेच झाले लोकसभा खासदार!

चर्चिल, रवी, सार्दिन लोकसभा निवडणुकीत यशस्वी; लुईझिन, पर्रीकर, विली मात्र पराभूत; पर्रीकर, लुईझिन पोचले होते राज्यसभेत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th May, 12:30 am
गोव्यात मुख्यमंत्रिपद भूषवलेले फक्त तिघेच झाले लोकसभा खासदार!

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या काही मोजक्याच नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांपैकी चर्चिल आलेमाव, फ्रा‌न्सिस सार्दीन आणि रवी नाईक हे तिघेच विजयी होऊन लोकसभेत पोहोचले. तर, लुईझिन फालेरो, स्व. मनोहर पर्रीकर व डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांना पराभव पत्करावा लागला होता. माजी मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर, स्व. शशिकला काकोडकर, प्रतापसिंग राणे, डॉ. लुईस प्रोत बार्बोजा, दिगंबर कामत, प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर व विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मात्र लोकसभा निवडणूक लढवलेली नाही.
माजी मुख्यमंत्री रवी नाईक (उत्तर गोवा) व फ्रान्सिस सार्दिन (दक्षिण गोवा) हे दोघेही १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन खासदार झाले. दोघांनीही काँग्रेसच्या उमेदवारीवर विजय मिळवला होता. यानंतर रवी नाईक यांनी पुन्हा काँग्रेसतर्फे २०१४ साली उत्तर गोव्यातून निवडणूक लढवली होती. मात्र, श्रीपाद नाईक यांच्याकडून ते पराभूत झाले होते. माजी मुख्यमंत्री सार्दिन हे मात्र १९९८ नंतर २००७ (पोटनिवडणूक) २००९ आणि २०१९ सालच्या निवडणुकीत विजयी झाले. १९९० साली फक्त १८ दिवस मुख्यमंत्रिपद भूषविणारे चर्चिल यांनी १९९६ साली दक्षिण गोव्यात युगोडेपाच्या तिकीटावर विजय मिळवून लोकसभेत सर्वप्रथम प्रवेश केला. त्यानंतर पुढच्याच लोकसभा निवडणुकीत (१९९८ साली) दक्षिण गोव्यात मात्र ते पराभूत झाले. कालांतराने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुन्हा २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत (दक्षिण गोवा) काँग्रेसच्या उमेदवारीवर विजय मिळवून ते दुसऱ्यांदा खासदार झाले.
मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या मनोहर पर्रीकर यांनी भाजपतर्फे उत्तर गोव्यातून १९९१ आणि १९९६ साली लोकसभा निवडणूक लढवलेली आहे. १९९१ साली काँग्रेसचे हरीश झांट्ये तर १९९६ साली मगोचे रमाकांत खलप यांच्याकडून ते पराभूत झाले. १९९८ साली मुख्यमंत्री बनलेल्या लुईझिन फालेरो यांनी १९८४ साली दक्षिण गोव्यातून गोवा काँग्रेसच्या उमेदवारीवर लोकसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे एदुआर्द फालेरो यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. प्रथम १९९३ आणि नंतर १९९८ साली मुख्यमंत्री बनलेल्या डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी १९९९ साली दक्षिण गोव्यातून आणि २००४ साली उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूक लढवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवताना ते दोन्ही वेळा पराभूत झाले.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी देशाचे संरक्षणमंत्री झाल्यानंतर स्व. मनोहर पर्रीकर हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर गेले. लुईझिन फालेरो हे २०२२ साली पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर (तृणमूल काँग्रेस) निवडून आले होते.                         

हेही वाचा