काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस हे दुटप्पी : सदानंद शेट तानावडे

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th April, 03:32 pm
काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस हे दुटप्पी : सदानंद शेट तानावडे

पणजी : गोवेकारांवर संविधान लादले, असे वक्तव्य करणारे काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस हे दुटप्पी आहेत. त्यांनी याबाबत चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. भाजपचा सामान्य कार्यकर्ताही त्यांच्यासोबत यावर चर्चा करू शकतो. मात्र अशा माणसासोबत आम्ही चर्चा करणार नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केली आहे.

पणजीत येते आज झालेल्या पत्रकार परिषदेत तानावडे बोलत होते. यावेळी आमदार दाजी साळकर आणि संकल्प आमोणकर उपस्थित होते.

फर्नांडिस हे स्वतः नौदलात होतो, असे सांगतात. मात्र, त्यांनी याआधीही आक्षेपार्ह विधाने केली आहेत. त्यांनी १५ ऑगस्ट रोजी वास्को येथील सेंट जसिंतो बेटावर भारताचा तिरंगा फडकवण्यास आक्षेप घेतला होता. एका फादरने शिवाजी महाराजांच्या संदर्भात अपशब्द वापरले, त्यावेळी देखील फर्नांडिस यांनी त्यांचे समर्थक केले होते. फर्नांडिस हेच गोव्यातील एकोपा बिघडवू पाहता आहेत, असे तानावडे यांनी म्हटले आहे.

फर्नांडिस यांनी संविधानाचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. संविधान लादले असे म्हणत त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचाही अपमान केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते तसेच राहुल गांधी यांनी याबाबत उत्तर देणे आवश्यक आहे. फर्नांडिस यांचा स्वतःवर विश्वास नाही. तसेच देशाच्या संविधानावरही विश्वास नाही. अशी व्यक्ती निवडणूक लढवण्यास पात्र नाही, असेही तानावडे यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २७ एप्रिल रोजी सांकवाळ येथे भव्य सभा होणार आहे. या सभेस ५० हजारांहून जास्त श्रोते उपस्थित राहणार आहेत. ही सभा संध्याकाळी ५ वाजता बिर्ला मंदिरच्या समोरील जागेत होणार अाहे, अशी माहिती खा. सदानंद शेट तानावडे यांनी दिली आहे.

हेही वाचा