बारावीच्या निकालात मुलींचेच ‘राज्य’

सरासरी ८४.९९ टक्के निकाल : ८८.०६ टक्क्यांसह मुली आघाडीवर, मुलांची टक्केवारी ८१.५९


22nd April 2024, 12:12 am
बारावीच्या निकालात मुलींचेच ‘राज्य’

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : यंदा राज्यातील बारावीचा निकाल ८४.९९ टक्के लागला आहे. परीक्षेला एकूण १७ हजार ५११ विद्यार्थी बसले होते. यांतील १४ हजार ८८२ उत्तीर्ण झाले. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ८८.०६ टक्के, तर मुलांचा निकाल ८१.५९ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १०.४६ टक्क्यांनी घटले आहे. गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी रविवारी पर्वरीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावर्षी २८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा झाली होती. परीक्षेला एकूण ८,२७६ विद्यार्थी बसले होते. त्यांतील ६,७५२ उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८१.५९ आहे. परीक्षा दिलेल्या एकूण ९,२३५ मुलींपैकी ८,१३२ उत्तीर्ण झाल्या. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८८.०६ होती. अभ्यासक्रमानुसार पाहता अन्य शाखांपेक्षा वाणिज्य शाखेतील विद्यार्थी यशस्वी ठरले. वाणिज्य शाखेच्या ५,४९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील ४,७५० (९०.७८ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेतील ४,१५६ विद्यार्थ्यांपैकी ३,५८८ (८६.३३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतील ५,७३६ पैकी ४,७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वांत कमी राहिले. याशिवाय व्होकेशलन कोर्स करणाऱ्या २,४२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यांतील १,८५४ म्हणजे ७६.४५ टक्के उत्तीर्ण झाले. विज्ञान आणि व्होकेशनल कोर्समधील उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी झाल्याने यंदा एकूण उत्तीर्ण होणाऱ्यांची टक्केवारी घसरल्याचे शेट्ये यांनी सांगितले.
मंडळाने आकरावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना आणली होती. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना बारावीच्या परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली होती. यानुसार १३८ खासगी उमेदवारांना संधी देण्यात आली. यांतील १८ जण (१३.०४ टक्के) उत्तीर्ण झाले. दहावी करून आयटीआय केलेल्या २१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यांतील १८ जण उत्तीर्ण झाले. यंदा बारावीला पुन्हा बसणाऱ्या (रिपिटर) विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २२.२२ टक्के राहिले. १८३ पैकी १६५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९०.१६ राहिली.
यंदाच्या परीक्षेत ३३ टक्क्यांहून कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २,५७९ होती. तर ६० ते ८० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५,७४३ होती. ४७ ते ५९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५,७५५ होती. यंदा दोन विद्यार्थी हे दुसऱ्या शिक्षण मंडळाचे होते. त्यांनी अद्यापही पात्रता दाखला न दिल्याने त्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती शेट्ये यांनी दिली.


राज्यातील शिक्षक चांगले काम करत आहेत; मात्र विद्यार्थी कष्ट करण्यात कमी पडत आहेत. विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापर वाढल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नाही. विज्ञान आणि व्होकेशनल कोर्समधील उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी झाले. अशा विविध कारणांमुळे यंदाचा निकाल कमी लागला आहे.
- भगीरथ शेट्ये, अध्यक्ष, गोवा शालान्त मंडळ
....


.....