प्रमाणाबाहेर दांडी मारल्यामुळे आसगावच्या डीएमसीचे ८८ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

आसगाव येथील डीएमसी महाविद्यालयामधील प्रथम वर्षातील एकूण ८८ विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी नाही

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
18th April, 04:32 pm
प्रमाणाबाहेर दांडी मारल्यामुळे आसगावच्या डीएमसीचे ८८ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

 म्हापसा : आसगाव येथील डीएमसी महाविद्यालयामधील  प्रथम वर्षातील एकूण ८८  विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नियमानुसार  ७५ टक्के हजेरी नसल्याने परीक्षेला बसण्याची परवानगी  नाकारण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून महाविद्यालयाने त्यांना पुरवणी परीक्षा देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेने केली. 

आज गुरुवारी १८ रोजी या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी एनएसयुआय, अभाविपी या विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकार्‍यांसमवेत प्राचार्य डॉ. दिलीप आरोलकर यांची भेट घेतली व आपली कैफियत त्यांनी त्यांच्यासमोर ठेवली. मुलांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हण़ून प्राचार्य या नात्याने सहानभुतीपुर्वक व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून दिलासा द्यावा, अशी विनंती पालकांनी डॉ. आरोलकर यांच्याकडे केली. गुरूवारी १८  रोजी परीक्षेचा तिसरा पेपर होता.

गोवा विद्यापीठाच्या नियमावलीनुसार वर्गात ७५ टक्के हजेरी अनिवार्य आहे. आणि गैरहजर राहिल्यास त्यासंबंधी स्वाभाविक स्पष्टीकरण किंवा आजारी असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र देणे गरजेचे असते. त्यानंतर विचार करुन विद्यार्थ्यांस सूट मिळते. ज्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी होती, अशांशी वेळोवेळी संपर्क साधून माहिती पुरविली होती. तसेच पालकांनाही याची कल्पना देण्याची सूचना केली होती. तरीही काही विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असे स्पष्टीकरण प्राचार्य आरोलकर यांनी दिले.

ज्या विद्यार्थ्यांची हजेरी कमी आहे, त्यांना त्यांचे हैरहजेरीचे कारण देण्यास कळविले आहे. ते विद्यापीठाकडे पाठवून अंतिम निर्णय विद्यापीठच घेणार आहे. पहिल्या वर्षातील एफव्हाय बीए, एफव्हाय बीएससी, एफव्हाय बी.कॉम, एफव्हाय बीसीए, एफव्हाय बीबीए या शाखेतील ८८ विद्यार्थ्यांना सत्रपरिक्षा देता आली नाही. 

 एनएसयुआयचे नौशाद चौधरी म्हणाले, प्रशासकीय दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांवर ही वेळ ओढवली आहे. परीक्षा १५  एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत. शनिवारी १३ तारखेला ज्यांची कमी हजेरी आहे त्यांचे आसन क्रमांक जाहीर करून त्यांना परिक्षेला बसणस मनाई करणारी नोटीस जारी करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक कृती किंवा स्पष्टीकरण देण्यास वेळ मिळाला नाही.