म्हापसा अर्बन बँकेवरून भाजप-काँग्रेस आमनेसामने

फाईल ओपन करणार : मुख्यमंत्री


01st May, 12:09 am
म्हापसा अर्बन बँकेवरून भाजप-काँग्रेस आमनेसामने

प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : उत्तर गोवा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी म्हापसा अर्बन बँकेत मोठा घोटाळा केला आहे. त्यामुळे लोकांचे पैसे बुडाले असून त्याचा जाब प्रत्येकाने त्यांना विचारावा. बँकेतील सर्व प्रकारच्या घोटाळ्यांची फाईल ओपन करून चौकशी करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.


मये येथील कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत आमदार प्रेमेंद्र शेट, सिद्धार्थ कुंकळ्येकर व इतर.
मये मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रेमेंद्र शेट, सिद्धार्थ कुंकळ्येकर, दयानंद कारबोटकर, शंकर चोडणकर, विश्वास चोडणकर, आरती बांदोडकर, विद्यानंद कारबोटकर, तसेच विविध सरपंच, पंच आदी उपस्थित होते. या मेळाव्यात सर्व बूथ प्रमुखांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मये मतदारसंघातून भाजपच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विश्वास चोडणकर यांनी सूत्रसंचालन केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत देशाने मोठी प्रगती साधली आहे. भारत सर्व क्षेत्रांत आदर्श ठरत असून जागतिक महागुरु बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ‘देश प्रथम’ हा आमचा नारा असून देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
सिद्धार्थ कुंकळ्येकर म्हणाले, ‘डबल इंजिन’ सरकारने राज्यात आणि देशात मोठी क्रांती घडवली आहे. पुन्हा एकदा मोदींच्या हाती देशाची धुरा सोपवणे आवश्यक आहे. आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बवण्यासाठी उत्तर गोवा मतदारसंघातून श्रीपाद नाईक यांना विक्रमी मतांनी विजयी करा.
घोटाळे करण्यात तरबेज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या साठ वर्षांत विविध प्रकारच्या घोटाळ्यांच्या माध्यमातून देशाची कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. त्यामुळे देश आर्थिकसह अन्य क्षेत्रांतही खिळखिळा झाला. त्यांच्या चार पिढ्यांनी देशाची संपत्ती लुटली आहे.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

...


फाईल बिनधास्त खुल्या करा : खलप
साखळीत काँग्रेसची जाहीर सभा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : म्हापसा अर्बन बँक स्थापन केल्यानंतर बँकेतून कर्ज देताना सर्व ती खबरदारी घेतली होती. योग्य सुरक्षा हमी घेऊनच कर्जे दिली. सर्व व्यवहार चोख आहेत. त्यामुळे म्हापसा अर्बन बँकेवरून पाठीमागून आरोप करू नका, समोर या. आपण खुल्या मंचावर याविषयी चर्चेसाठी तयार आहोत. मुख्यमंत्र्यांनीही बिनधास्तपणे फाईल्स खुल्या कराव्यात. आपण घाबरत नाही, असे प्रतिआव्हान रमाकांत खलप यांनी साखळीतील काँग्रेस सभेत दिले.
व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, महाराष्ट्रातील नेते संभाजीराव मोहिते, शिवसेनेचे राज्यप्रमुख जितेश कामत, आपचे राजेश कळंगुटकर, गोवा फॉरवर्डचे संतोषकुमार सावंत, नगरसेवक प्रवीण ब्लेगन, माजी आमदार प्रताप गावस, सदानंद मळीक, माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, राजेश सावळ, सुनीता वेरेकर, साखळीचे गटाध्यक्ष मंगलदास नाईक, डिचोलीचे गटाध्यक्ष मनोज नाईक, मयेचे गटाध्यक्ष बाबी च्यारी व इतर उपस्थित होते.
आपण मगो पक्षात असताना भाजपने गोव्यात नुकताच प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपचे आमदार निवडून यावेत यासाठी आपण प्रयत्न केले होते. श्रीपाद नाईक मडकईतून निवडून येण्यासाठी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत आपणही प्रचार केला होता. आज तेच लोक आपल्या विरोधात बोलत आहेत, असेही खलप यावेळी म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर येणार होते, त्याचे काय झाले ? गोव्याला विशेष दर्जा देण्याच्या घोषणेचे काय झाले ? २०१४ मध्ये केंद्रात भाजप सरकार स्थापन होताच तीन महिन्यांमध्ये राज्यातील खाणी सुरू होणार होत्या, त्याचे काय झाले ? आदी सावल त्यांनी उपास्थित केले.
महाराष्ट्रातील नेते संभाजीराव मोहिते म्हणाले, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना त्या आदिवासी समाजातील असल्याने बोलावले नाही. जाती-धर्माच्या आधारे राजकारण करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. यावेळी जनता त्यांना धडा शिकवणार आहे.
यावेळी प्रवीण ब्लेगन, मेघःश्याम राऊत, माजी आमदार प्रताप गावस, सदानंद मळीक, वाळपई काँग्रेसच्या नेत्या मनीषा उसगावकर, आपचे राजेश कळंगुटकर, गोवा फॉरवर्डचे संतोषकुमार सावंत, शिवसेनेचे जितेश कामत यांचीही भाषणे झाली. साखळीचे गटाध्यक्ष मंगलदास नाईक यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन अंकुश कामत यांनी केले.

हेही वाचा