ऊस उत्पादकांना ‘संजीवनी’ मिळण्याबाबत संभ्रम कायम

पुढील मोसमात कारखान्यात ऊस स्वीकारण्याबाबत संघटनेला विश्वास

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th April, 11:29 pm
ऊस उत्पादकांना ‘संजीवनी’ मिळण्याबाबत संभ्रम कायम

पत्रकारांना माहिती देताना राजेंद्र देसाई व इतर.                  

फोंडा : धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्यात राज्यात लागवड केलेला ऊस पुढील मोसमात घेणार असल्याची बैठकीच्या इतिवृत्तांताची प्रत ऊस उत्पादकांना मिळाल्याने ऊस उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, या संदर्भात कार्यवाही होण्याबाबत शाश्वती नसल्याने उत्पादक संभ्रमात आहेत.

यासंबंधी ऊस उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासक राजेश देसाई यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. येत्या हंगामात राज्यात लागवड केलेला ऊस कारखान्यात घेतला जाणार असल्याने सर्व ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त उसाची लागवड करण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी प्रशासक राजेश देसाई यांची ऊस उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन याविषयी चर्चा केली. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, हर्षद प्रभुदेसाई, फ्रान्सिस मास्कारेन्हास, दयानंद फळदेसाई व पदाधिकारी उपस्थित होते.                  

इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी ऊस उत्पादकांनी दि. ८ जानेवारी रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यानंतर दि. ९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठक घेऊन काही निर्णय घेतले होते. त्या बैठकीचे इतिवृत्तांत संजीवनी साखर कारखान्याचे प्रशासक राजेश देसाई यांनी ऊस उत्पादकांना दिले होते. त्यात पुढील हंगामात कारखान्यात ऊस घेणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

बैठकीच्या इतिवृत्तांतमध्ये नमूद केल्याप्रमाणे कारखान्यातर्फे ऊस उत्पादकांना प्रमाणपत्रे देण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांनी अधिकाधिक ऊस लागवड करून पुढील हंगामात कारखान्याकडे देण्यासाठी सज्ज व्हावे.  —  राजेंद्र देसाई, अध्यक्ष, ऊस उत्पादक संघटना