टी-२० विश्वचषक : युवा खेळाडूंच्या संघाला अनुभवाचाही तडका !

भारतीय संघाची घोषणा : रोहित कर्णधार, विराटही संघात


01st May, 12:00 am
टी-२० विश्वचषक : युवा खेळाडूंच्या संघाला अनुभवाचाही तडका !

क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मंगळवारी भारतीय संघाची आगामी टी-२० विश्वचषकासाठी घोषणा झाली. यात अपेक्षेप्रमाणे कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आले, तर विराट कोहलीलाही अंतिम १५मध्ये संधी देण्यात आली. मात्र हार्ड हिटर रिंकू शर्माला या विश्वचषकातून वगळण्यात आल्यामुळे संघ निवडीवर चाहत्यांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
रिंकू सिंगला मुख्य संघात स्थान मिळू शकलेले नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे त्याला आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून फलंदाजीची संधी मिळाली नाही. रिंकूला आयपीएलमध्ये अधिक सामने मिळाले असते तर तो अधिक ठळकपणे उदयास आला असता व कदाचित संघातही त्याला स्थान मिळू शकले असते. रिंकू सिंगचा वर्ल्ड कपसाठी राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे, मुख्य खेळाडू म्हणून नाही. रिंकू सिंगने या आयपीएलमध्ये आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर फक्त १२३ धावा आहेत. या कालावधीत त्याची सरासरी २०.५० आणि स्ट्राइक रेट १५०.००चा आहे.
रिंकू सिंगप्रमाणेच शुभमन गिलचाही राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. यावेळी तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. शुभमन गिलने आतापर्यंत आयपीएलच्या १० सामन्यांमध्ये ३२० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ३५.५६ आणि स्ट्राइक रेट १४०.९७ आहे. गेल्या वेळी शुभमन गिल आयपीएलचा ऑरेंज कॅपधारक होता. गिलने १७ सामन्यांत ८९० धावा केल्या होत्या. या काळात त्याची सरासरी ५९.३३ आणि स्ट्राईक रेट १५७.८० इतका होता.
विराट, रोहितमुळे रिंकू, गिल राखीव खेळाडू ?
रिंकू सिंग आणि शुभमन गिल यांना राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्याचे कारण रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यासाठी भारतीय संघात स्थान निर्माण करण्याचे असू शकते. रोहित व विराट आपला अखेरचा टी-२० विश्वचषक खेळत आहेत तर भविष्यात गिल व रिंकू यांना अधिक संधी मिळू शकते. शिवाय टी-२०मध्ये रोहित व विराटचा अनुभवाचा फायदाही भारतीय संघाला मिळू शकतो. त्यामुळेच बीसीसीआयने या दोघांना बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता क्रीडा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

केवळ युवांवर अवलंबून राहून टी-२० विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा जिंकता येणार नाही, हे बीसीसीआयला समजले आहे. भारताला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवायचा असेल, तर अनुभवी खेळाडूंवरही विश्वास ठेवावाच लागेल. या योजनेअंतर्गत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. मात्र यासाठी बीसीसीआयला काही नकोसे निर्णयही घ्यावे लागले आहे हे मात्र खरे.            

हेही वाचा