सामाजिक जागृतीसाठी शिक्षण खात्याकडून रिल्स स्पर्धा

बारावीपर्यंतच्या विद्यार्थी, शिक्षकांना सहभागी होता येणार; परिपत्रक जारी


30th April, 11:49 pm
सामाजिक जागृतीसाठी शिक्षण खात्याकडून रिल्स स्पर्धा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक स्थितीची जाणीव व्हावी, या हेतूने शिक्षण खात्याने बारावीपर्यंतचे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी रिल्स बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या ३०​ मेपर्यंत स्पर्धेसाठी रिल्स पाठवायच्या आहेत. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.
सध्याचे युग डिजिटलचे आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या रिल्स, व्हिडिओंना महत्त्व प्राप्त झालेले आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये या गोष्टींचे आकर्षण असल्यामुळे त्या माध्यमातून त्यांच्यात सामाजिक भावना वाढवण्याच्या हेतूने शिक्षण खात्याने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, समस्या असतात. त्याचा फटका नागरिकांना बसत असतो. अशा सामाजिक समस्या, प्रश्नांवर मात करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्पर्धेत बारावीपर्यंतचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी​ होऊ शकतात. त्यांनी कोणत्याही सामाजिक विषयावर एक मिनिटाची रिल्स बनवून ती स्पर्धेसाठी पाठवून द्यावी, असे संचालक झिंगडे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी अटी काय ?
रिल्स केवळ सामाजिक विषयांबाबतची, एक मिनिटापर्यंतची आणि पोट्रेट मोडमध्ये रेकॉर्ड केलेली असावी.
रिल्समध्ये संगीत तसेच प्रतिमांचा वापर करण्यास मुभा असेल.
सहभागी स्पर्धकांनी आपला वैयक्तिक तपशीलाचा उल्लेख अर्जात करावा. रिल्समध्ये त्यांना तो उल्लेख करता येणार नाही.
एका विद्यार्थी किंवा शिक्षकाला एकच रिल स्पर्धेसाठी पाठवता येईल.
रिल्स ३० मे २०२४ पर्यंत शिक्षण खात्याच्या पोर्टलवर अर्जासह अपलोड करता येईल.
स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्रे देण्यात येतील.
उत्कृष्ट रिल्स शिक्षण खात्याच्या मीडिया हँडलवरून प्रसारित करण्यात येतील.                  

हेही वाचा