निलंबित पोलीस निरीक्षक पिळगावकरला सशर्त जामीन मंजूर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st May, 12:17 am
निलंबित पोलीस निरीक्षक पिळगावकरला सशर्त जामीन मंजूर

पणजी : लाच प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) अटक केलेल्या निलंबित पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर याला विशेष न्यायालयाने २ लाख रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश उत्तर गोवा जिल्हा प्रधान न्या. शैरीन पाॅल यांनी दिला आहे.
पृथ्वी एच. एन. या पॅराग्लायडिंग व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यात त्यांनी तेरेखोल किनारी पोलीस स्थानकाचे कायदेशीर परवाना नसल्याचा दावा करून जानेवारी २०२४ मध्ये प्रति महिना १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी निलंबित हवालदार संजय तळकर याने केली होती. त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर लाचेची रक्कम ८ हजार रुपये करण्यात आली होती.
त्यानुसार, तक्रारदाराने अॅपद्वारे ८ हजार रुपये तळकर याच्या खात्यात जमा केले. दरम्यान, २२ मार्च रोजी संशयित व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून तक्रारदाराच्या विरोधात खोट्या आरोपांवरून गुन्हा दाखल करून त्याचे पॅराग्लायडिंग जप्त करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या संदर्भात तक्रारदाराने एसीबीकडे पुरावेही सादर केले. त्यानंतर एसीबीने प्रथम संजय तळकर याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. तसेच या प्रकरणात सहभागी असल्यामुळे एसीबीने हवालदार उदयराज कळंगुटकर यालाही अटक केली. त्यानंतर एसीबीने तत्कालीन पोलीस निरीक्षक विद्धेश पिळगावकर यालाही अटक केली होती. अटक केल्यानंतर तिघांना पोलीस खात्याने निलंबित केले. त्यातील संजय तळकर आणि उदयराज कळंगुटकर या दोघांना विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता.
दरम्यान, विद्धेश पिळगावकर याने पणजी येथील विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी सुनावणी घेऊन न्यायालयाने पिळगावकर याला २ लाख रुपये व तितक्याच रकमेचा एक हमीदार, परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाण्यास बंदी तसेच इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.