अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांची ९७ कोटींची मालमत्ता जप्त; समोर आले 'हे' कारण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th April, 03:37 pm
अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांची ९७ कोटींची मालमत्ता जप्त; समोर आले 'हे' कारण

मुंबई : नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार ईडीने धडक कारवाई करत व्यवसायिक राज कुंद्रा आणि त्याची पत्नी शिल्पा शेट्टी यांच्या एक बंगला तसेच जुहूमधील आलीशान फ्लॅटसह तब्बल ९७ कोटींची मालमत्ता जप्त केली. २०२१ साली मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचा सहभाग आढळून आल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली होती. काही काळ तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. 

समोर आलेल्या माहितीनुसार राजने अनेक लोकांकडून क्रिप्टोकरन्सी बीटकॉइन्सच्या माध्यमातून निधी गोळा करत दरमहा त्यावर १० टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ईडीच्या तपासात, राज यांनी यूक्रेनमध्ये क्रिप्टोकरन्सी मायनिंग फार्म उभारण्यासाठी गेन बीटकॉनचे सर्वेसर्वा अमित भारद्वाज यांच्याकडून २८५ हून अधिक बीट  कॉइन घेतले असल्याचे समोर आले आहे. भारतात क्रिप्टोकरन्सीवर अनेक निर्बंध आहेत. राज कुंद्राने बिटकॉइनच्या माध्यमातून व्यवसाय करून व्यवहारात फेरफार केल्याचा तपास यंत्रणेचा आरोप आहे. 

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेल्या मुंबईतील पॉश जुहू भागातील अपार्टमेंट, तसेच पुण्यातील बंगला आणि कुंद्राच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. संलग्न केलेल्या मालमत्तेचे / समभागांचे वैयक्तिक मूल्यांकन ईडीने उघड केलेले नाही. मेसर्स व्हेरिएचल टेक पीटीई लिमिटेड, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतर अनेक पोंजी स्कॅम चालवणाऱ्या एजंट्स विरुद्ध महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारावर ईडीची कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे.

अमित भारद्वाज यांना एप्रिल २०१८मध्ये २००० कोटींच्या घोटाळ्यात ईडीने अटक केली होती. त्याच्यावर तब्बल ८ हजार लोकांना आपल्या जाळ्यात ओढून अनेक बीटकॉइन स्कॅम्सद्वारे त्यांना फसवल्याचा ठपका ईडीने ठेवला होता. तेव्हा राज कुंद्रा यांना देखील चौकशीला बोलावण्यात आले होते. दरम्यान तत्कालीन अधिकाऱ्यांनी राज आणि शिल्पाच्या भूमिकेबाबत आताच काही सांगता येणार नाही असे सांगितले होते. पण सध्या ज्या प्रमाणे जप्तीची कारवाई करण्यात आली आहे ते पाहता ईडीकडे राज आणि शिल्पा विरोधात ठोस पुरावे असल्याचे समजते.  दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपींनी २०१७ मध्ये बिटकॉइनच्या रूपात ६,६०० कोटी रुपयांची मोठी रक्कम गोळा केली होती. गुंतवणूकदारांकडून मिळवलेली ही बिटकॉइन्स अमित भारद्वाजने गोळा केली होती आणि ती आता कुंद्राच्या ताब्यात आहेत. त्यांची किंमत १५० कोटीहून अधिक आहे.