'या' आईने केवळ एक लाखांसाठी पोटच्या मुलीला गोव्यात विकले

गोव्यातील दाम्पत्यासह ५ जणांवर गुन्हा नोंद. सासूने फोन करून माहिती दिल्याने प्रकरण उजेडात आले

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
18th April, 01:44 pm
'या' आईने केवळ एक लाखांसाठी पोटच्या मुलीला गोव्यात विकले

कोल्हापूर : सततचे गैरसमज आणि  भांडणे यास कंटाळून पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मित्राच्या मदतीने पोटच्या मुलीला १ लाखांत गोव्यातील दाम्पत्यास विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात मुलीचे वडील दिलीप विकास ढेंगे (३० रा. हातकणंगले ) यांनी पोलिसांत रीतसर तक्रार दिली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.  

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप आणि पुनम यांचे २०१८ साली लग्न झाले. त्यांना ३ वर्षांचा मुलगा आणि १ वर्षीय मुलगी आहे. व्ययक्तिक कारणांमुळे दोघेही विभक्त राहतात. पुनम आपल्या आईकडे पट्टनकोडोली येथे राहते. गेल्या १३ एप्रिल रोजी दिलीप यांना त्यांच्या सासूने फोन करून पुनमने मुलगी दत्तक दिल्याची माहिती देत एकदा चौकशी करून यावी असे सांगितले. दरम्यान चौकशी केली असता पुनम आपल्या मित्रासमवेत इचलकरंजी येथे राहत असल्याचे समजले. 

तेथे जाऊन पुनम कडे दिलीपने विचारणा केली असता आपण मुलीला आष्टी-सांगलीत पाळणाघरात ठेवल्याचा बनाव पुनमने केला. मुलीला आत्ताच भेटायचे आहे म्हणून दिलीप आग्रहास पेटल्याने पुनमने आपल मुलीला गोव्यात दत्तक दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची नोटरीही दाखवली. 

पुढे मुलीला विकण्यात आल्याची खात्री होताच दिलीपने तडक नजीकच्या पोलीस स्थानकात धाव घेतली. सदर नोटरी ही करवीर तहसीलदार कार्यालयाच्या हद्दीत झाल्याने त्यांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात जावे लागले. तेथे पोलिसांनी दिलीप यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने मुलीची आई पूनम दिलीप ढेंगे (वय २५, मूळ रा. इंगळी, सध्या रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), तिचा मित्र सचिन आण्णाप्पा कोंडेकर (वय ४०, रा. शहापूर, इचलकरंजी), मध्यस्थी करणारा किरण गणपती पाटील (वय ३०, रा. केर्ली, ता. करवीर) आणि गोव्यातील दाम्पत्य फातिमा फर्नांडिस व जेरी पॉल नोऱ्होंन्हा यांच्यावर गुन्हा दाखल केला व त्यातील तिघांना अटक केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा