बाळ्ळीत बसच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

कुंकळ्ळी पोलिसांकडून गुन्हा नोंद; बसचालक चौकशीअंती अटकेत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 02:07 pm
बाळ्ळीत बसच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

मडगाव : भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटला व बाळ्ळी येथील महामार्गावर त्याने समोर जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक एकनाथ यशवंत नाईक (६०, रा. बेतूल) यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांकडून पुढील तपास केला जात असून बसचालकाला ताब्यात घेण्यात आलेले आहे.राज्यातील अपघातांची संख्या वाढत असून अपघातात मृत्यूंची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक बंगळुरु येथील खासगी बस बाळ्ळी इस्पितळ परिसरातील महामार्गावर आली असता बसचालक दुर्गाप्पा कारबोंडा (३७, रा. हावेरी कर्नाटक) याचा बसवरील ताबा सुटला. बस वेगात असल्याने समोरुन जाणाऱ्या दुचाकीला बसची धडक बसली व यात दुचाकीचालक एकनाथ यशवंत नाईक या बेतूल येथील नागरिकाला गंभीर दुखापत झाली. रक्तस्त्राव होत असल्याने नाईक यांना बाळ्ळी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.  

अपघात झाल्याचे समजताच बेतूल येथील नागरिक तत्काळ बाळ्ळी येथे आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ नाईक हे आपल्या भावाला बाळ्ळी येथील इस्पितळात डायलेसिससाठी घेउन आलेले होते. त्यावेळी हा अपघात घडला. खासगी बसच्या वेगावर निर्बंध नसतात.  बाळ्ळी इस्पितळानजीकच्या रस्त्यावर गतिरोधक किंवा रम्बलर उभारण्यात आलेले नसल्याने गाड्या वेगाने जातात. बाळ्ळी इस्पितळात मृतदेह ठेवण्यात आलेला असून इस्पितळात शववाहिका उपलब्ध नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खासगी शववाहिनी आणून मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यास सांगण्यात येते. ही शोकांतिका असून राज्य सरकारने या गोष्टींकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. कुंकळ्ळी पोलिसांकडून या अपघातप्रकरणी गुन्हा नोंद केलेला असून बसचालक दुर्गाप्पा कारबोंडा (रा. हावेरी कर्नाटक) याला चौकशीअंती अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक डायगो ग्रॅसिअस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.